कुणबी मराठा दाखल्यावर कुंभारी येथील महिला सरपंचपदी राज्यातील पहिल्या कुणबी मराठा सरपंच वर्षाराणी दळवे यांची बिनविरोध निवड


धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथील नव्याने झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीमध्ये वर्षाराणी संतोष वडणे यांची निवड करण्यात आली आहे. या साठी त्यांना इतर मागास प्रवर्गातील कुणबी नोंदीचा दाखलाही मिळाल्याने फायदा झाला. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अखंड मराठा समाजाच्या आंदोलनानंतर शिंदे समितीकडून ज्या कुणबी नोंदी मिळाल्या त्या मध्ये पोखरापूर, ता. मोहोळ, जि. सोलापूर येथील भगिनी वर्षाराणी सत्यवान दळवे (सासरचे नाव - वर्षाराणी संतोष वडणे) यांची कुणबी मराठा नोंद असल्याची सापडली. त्यानंतर त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालं. माहेरी मिळालेल्या मराठा कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी सासरी तुळजापूर येथील कुंभारी गावात रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी दाखल केली होती. (शुक्रवार, दि.30 मे) रोजी सरपंच निवडीसंदर्भातील बैठक झाली. त्यावेळी वर्षाराणी दळवे या बिनविरोध निवडून आल्या.