धाराशिव शहर पोलीसांची तत्पर कारवाई — ३.२५ लाख रुपये किंमतीचे गोवंशीय जनावरे व वाहन जप्त



 धाराशिव (प्रतिनिधी) :

धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने गोवंशीय जातीच्या जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणारा प्रकार उघडकीस आणला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी समिर मिया शेख (वय ३७ वर्षे, रा. सांजा वेश गल्ली, धाराशिव, ता. धाराशिव) यांनी दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ७.४५ वाजता, खिरणीमळा परिसरात पिकअप वाहन (क्रमांक एमएच २५ पी ५२०९) मध्ये गोवंशीय जातीचे एक जर्सी गाय व तीन जर्सी गायीची वासरे, अशा एकूण चार जनावरांची वाहतूक करत असल्याचे आढळले.

वाहनातील जनावरांचे तोंड व चारही पाय बांधलेले असून, त्यांना चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता निर्दयतेने कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांनी तपासात स्पष्ट केले आहे.

या प्रकरणात एकूण मालमत्ता किंमत सुमारे ३ लाख २५ हजार रुपये एवढी असल्याचे पोलिसांनी सांगितले.


याबाबत धाराशिव शहर पोलिसांनी सरकारतर्फे नमूद आरोपीविरुद्ध

प्राण्यांवर क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११(१)(ब) आणि प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५(अ)(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दराडे साहेब करत आहेत.