हयातीचा दाखला आता ऑनलाइन; लाभार्थ्यांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी – तहसीलदार अरविंद बोळंगे यांचे आवाहन


तुळजापूर, दि. १ जून २०२६ : शासनाच्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात वारंवार येण्याची आवश्यकता राहिलेली नाही. केंद्र शासनाने विकसित केलेल्या B.S.L.A.E. (ऑनलाइन हयाती प्रमाणपत्र प्रणाली) द्वारे लाभार्थी आता घरबसल्या मोबाईलवरून हयातीचा दाखला ऑनलाइन सादर करू शकतात, अशी माहिती तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या विशेष सहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, तसेच केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना यांचा लाभ घेणाऱ्या पात्र लाभार्थ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. या योजनांमध्ये वृद्ध, विधवा, निराधार महिला-पुरुष, दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती तसेच अनाथ १८ वर्षांखालील मुला-मुलींचा समावेश होतो.
पूर्वी लाभार्थ्यांना प्रत्येक वेळी तहसील कार्यालयात जाऊन हयातीचा दाखला सादर करावा लागत असल्याने विशेषतः वृद्ध व आजारी लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही अडचण दूर करण्यासाठी केंद्र शासनाने ही ऑनलाइन प्रणाली विकसित केली आहे.
लाभार्थी स्वतःच्या मोबाईलवरून किंवा नातेवाईकांच्या मदतीने तसेच ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र आणि नागरी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करू शकतात. एकदा प्रमाणपत्र ऑनलाइन सादर झाल्यानंतर त्याची प्रत तहसील कार्यालयात जमा करण्याची आवश्यकता राहणार नाही.
विहित कालावधीत हयातीचा दाखला ऑनलाइन सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्यांचा योजनेचा लाभ बंद होऊ शकतो. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी वेळेत ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी केले आहे.