चोरीच्या 4 मोटारसायकलींसह आरोपी अटक; कळंब पोलिसांची यशस्वी कारवाई

कळंब (प्रतिनिधी): कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणांहून चोरीस गेलेल्या चार मोटारसायकलींचा गुन्हा उघडकीस आणत कळंब पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 70 हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 115/2015, गुन्हा क्र. 287/2026, गुन्हा क्र. 286/2026 तसेच कर्नाटक पासिंगच्या ट्विस्टर मोटारसायकल चोरीप्रकरणी गुन्हे दाखल होते. फिर्यादींच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला होता.
मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर आणि कळंब उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक श्री संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शेख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार अजीज शेख, जुबेर काझी तसेच पोलीस अंमलदार परमेश्वर कदम आणि अमोल माळी यांच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास केला.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी लखन उर्फ रमेश उत्रेश्वर दळवी (रा. कळंब, ता. कळंब, जि. धाराशिव) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने संबंधित चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्याला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास कळंब पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.