स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात मनसे आक्रमक; वेताळ नगरातील मीटर बसविण्याचे काम थांबले

तुळजापूर | प्रतिनिधी रुपेश डोलारे 
तुळजापूर, उमरगा व लोहारा तालुक्यात महावितरण कंपनीकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र भूमिका घेत निवेदन सादर केले. सर्वसामान्य नागरिकांवर कोणतीही पूर्वकल्पना किंवा जनजागृती न करता स्मार्ट मीटर लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मनसेने केला.
महागाई, शेतीचे संकट, बेरोजगारी आणि वाढते वीजदर यामुळे नागरिक आधीच आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात वाढ होण्याची शक्यता, रिचार्ज प्रणालीमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका, ग्रामीण भागातील नेटवर्कच्या अडचणी तसेच पारदर्शकतेचा अभाव यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे मनसेने निवेदनात नमूद केले.
मनसेने महावितरणकडे तातडीने तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. तुळजापूर, उमरगा व लोहारा तालुक्यात स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती त्वरित रद्द करावी, केवळ स्वेच्छेने मागणी करणाऱ्या ग्राहकांनाच स्मार्ट मीटर द्यावेत आणि जनतेला विश्वासात घेऊन संपूर्ण माहिती दिल्याशिवाय कोणत्याही घरात सक्तीने मीटर बसवू नयेत, अशी मागणी करण्यात आली.
मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. तसेच मनसेच्या पाठपुराव्यानंतर तुळजापूर शहरातील वेताळ नगर परिसरात सुरू असलेले स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सध्या थांबविण्यात आल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला.


यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, विधानसभा अध्यक्ष मयूर गाढवे, तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार, माजी तालुकाध्यक्ष धनाजी साठे, धर्मराज सावंत, विशाल माने, शशिकांत तांबे, अमोल मोठे, मनोज सोनवणे, समीर शेख, लहू सोनवणे, सोमेश्वर आलोरे, ओंकार मुळे, शिरीष डुकरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.