श्री तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीने नागपंचमी उत्साहात साजरी

श्री तुळजाभवानी मंदिरात आज नागपंचमीचा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. आज श्रावणातील पहिला सोमवार असल्याने नागपंचमी आणि श्रावणी सोमवार असा दुहेरी योग आल्याने मंदिरात भाविकांची गर्दी होती.
नागपंचमीनिमित्त मंदिरातील होमकुंडासमोर नागदेवतेची पूजा करण्यासाठी सकाळपासूनच स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रथापरंपरेनुसार होमासमोर भवानी-शंकराचा पितळी नागफणा मांडण्यात आला होता. त्यासमोर चिखलाची नागदेवता तयार करून तिची पूजा करण्यात आली.
महिलांनी नागदेवतेला दूध, लाह्या तसेच उकडलेले कानवले अर्पण करून पूजा केली.


नागपंचमीच्या निमित्ताने सायंकाळी महिलांनी मंदिर परिसरात फेर, भुलई आदी पारंपरिक खेळ खेळून उत्साहात नागपंचमी साजरी केली. प्रथेनुसार सायंकाळी ५ ते ६ या वेळेत एक तास मंदिरात पुरुषांना प्रवेश बंद ठेवण्यात आला होता.
सायंकाळी चौघडा वाद्याच्या गजरात नागदेवतेची उत्तरपूजा करण्यात आली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने नागदेवतेचे कल्लोळ तीर्थामध्ये विसर्जन करण्यात आले. यावेळी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, सौमय्याश्री पुजार, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, नागेश शितोळे, सहायक सुरक्षा निरीक्षक ऋषभ रेहपांडे व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.