धाराशिव : प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाचा तिसरा हप्ता मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडून ४ हजार रुपये आणि त्याच्या मित्राच्या घरकुलाचा हप्ता टाकण्यासाठी ७ हजार रुपये, अशी एकूण ११ हजार रुपयांची लाच मागून स्वीकारल्याप्रकरणी सिंदगाव ग्रामपंचायतीचे सरपंच तथा प्रशासक सुरेश श्रीमंत बिराजदार (वय ४९) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाराशिव पथकाने ताब्यात घेतले. तक्रारदार हा २४ वर्षीय मजूर असून, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्याचे व त्याच्या मित्राचे घरकुल मंजूर झाले आहे. दोघांना यापूर्वी दोन हप्ते मिळाले होते. तिसरा हप्ता पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना सांगून टाकून देतो तसेच काम करून घेतो, असे सांगत सरपंच बिराजदार यांनी तक्रारदाराकडे पैशांची मागणी केल्याची तक्रार २१ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. यावेळी जळकोट येथे झालेल्या भेटीत सरपंच बिराजदार यांनी तक्रारदाराच्या घरकुलासाठी ४ हजार रुपये व त्याच्या मित्राच्या घरकुलासाठी ७ हजार रुपये, अशी एकूण ११ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. जळकोट येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोरील रस्त्यावर सरपंच बिराजदार यांनी पंचांसमक्ष ११ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबी पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब एम. नरवटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस निरीक्षक विजय वगरे, पोलीस हवालदार आशिष पाटील, पोलीस हवालदार अमर माने, चापो हवालदार करडे व पोलीस शिपाई जाकिर काझी यांचा समावेश होता. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांनी काम पाहिले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. धाराशिव एसीबी कार्यालय : ०२४७२-२२२८७९ व्हॉट्सॲप : ९२७०२३१०६४ टोल फ्री : १०६४
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.