तुळजापुरातील अवैध धंद्यांवर कारवाई करा; अन्यथा लाक्षणिक उपोषण.... नगराध्यक्ष विनोद गंगणे

 


तुळजापूर : ...शहरातील विविध भागांत परवाना व नियमांचे पालन न करता सुरू असलेल्या मटका, जुगार, हातभट्टी, ताडी, दारू विक्री तसेच अमली पदार्थांच्या कथित अवैध व्यवसायांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नगराध्यक्ष विनोद विलासराव गंगणे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी तुळजापूर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना लेखी निवेदन दिले आहे.
शहरातील काही प्रभागांमध्ये संबंधित परवानगी व नियमांचे पालन न करता अवैध व्यवसाय सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या व्यवसायांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता तसेच सार्वजनिक आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे नगराध्यक्षांनी म्हटले आहे.
संबंधित ठिकाणी पोलिस प्रशासनाने तातडीने पाहणी करून व्यवसायाची कागदपत्रे, परवाने आणि इतर आवश्यक बाबींची तपासणी करावी. आवश्यक परवानगी नसल्याचे अथवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित व्यवसाय तात्काळ बंद करून नियमानुसार कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच भविष्यात अशा प्रकारचे व्यवसाय पुन्हा सुरू होऊ नयेत, यासाठी नियमित तपासणी करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.



तीन दिवसांच्या आत कारवाई करून संबंधित अवैध व्यवसायांच्या मूळ मालकांवर गुन्हे दाखल करावेत; अन्यथा नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत लाक्षणिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.या निवेदनावर नगराध्यक्ष उपाध्यक्ष सत्तारूढ नगरसेवक स्वीकृत नगरसेवक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


दरम्यान, नगराध्यक्षांनी दिलेल्या या निवेदनावर पोलिस प्रशासन कोणती भूमिका घेते आणि संबंधित ठिकाणी प्रत्यक्षात काय कारवाई केली जाते, याकडे तुळजापूर शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.