कळंब येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

कळंब, धाराशिव : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, कळंब येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिवासी समाजातील थोर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक योगदान याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसतिगृहाचे गृहपाल एल. एम. रचावाड सर यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते राकेश भैय्या कोमटवार यांनी आदिवासी समाजासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध शैक्षणिक सुविधा तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देत मार्गदर्शन केले.
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाला प्राधान्य देऊन उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते अमोल आण्णा शेळके, रोशन भैय्या कोमटवार, मुकुंद साखरे, तसेच आदिवासी बांधव अशोक काळे, नवनाथ काळे, वसतिगृहातील विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता वसतिगृह कर्मचारी जी. एम. नन्नवरे सर यांनी केली.
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे जतन, शिक्षणाचा प्रसार आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाचा संदेश देण्यात आला.