तुळजापूर गोळीबार प्रकरणातील दोन मुख्य आरोपींना जामीन मंजूर! ॲड. विराज जगदाळे यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाचा निर्णय; कणे स्टॉप परिसरातील गोळीबाराच्या घटनेने शहरात उडाली होती खळबळ

तुळजापूर | प्रतिनिधी रुपेश डोलारे.
तुळजापूर शहरातील धाराशिव-तुळजापूर रस्त्यावरील कणे स्टॉप परिसरात नवरात्रोत्सवादरम्यान घडलेल्या गोळीबाराच्या प्रकरणात दोन मुख्य अटक आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपींच्या वतीने ॲड. विराज विलासराव जगदाळे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. या निर्णयामुळे शहरात चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.
नेमकी घटना काय?
तुळजापूर शहरातील गजबजलेल्या कणे स्टॉप परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटांमध्ये वाद होऊन हाणामारी आणि गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला होता.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक 512/2026 अन्वये भारतीय शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी पिस्तूल, पिवळ्या रंगाची रिकामी पुंगळी तसेच इनोव्हा कार जप्त केल्याची माहिती आहे.
न्यायालयात प्रभावी युक्तिवाद
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन मुख्य आरोपींच्या वतीने ॲड. विराज विलासराव जगदाळे यांनी वकीलपत्र दाखल करून जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयात आरोपींच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद आणि प्रकरणातील उपलब्ध कागदपत्रांचा विचार करून न्यायालयाने दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला.
या प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. संजय पवार यांचे मार्गदर्शन, तर ॲड. ओंकार मस्के यांचे सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले.
कणे स्टॉप परिसरातील या गोळीबाराच्या घटनेने नवरात्रोत्सवादरम्यान तुळजापूर शहरात मोठी खळबळ उडाली होती. आता दोन्ही मुख्य आरोपींना जामीन मंजूर झाल्याने या प्रकरणाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.