चिवरी पंचायत समिती गणातून, उपसरपंच संजय चनबस भोसले यांची महाविकास आघाडी कडून उमेदवारीची मागणी.

 


तुळजापूर तालुक्यातील चिवरी पंचायत समिती गणातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपतालुका प्रमुख, गंधोरा ग्रामपंचायतचे उपसरपंच, तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, तुळजापूर चे संचालक म्हणून काम पाहणारे श्री. संजय चनबस भोसले यांनी आगामी पंचायत समिती निवडणुकीतून महाविकास आघाडी कडून उमेदवारी मागणार असल्याचे जाहीर केले आहे.


श्री. संजय भोसले हे अनेक वर्षांपासून समाजकार्य, कृषीविकास, ग्रामविकास आणि जनसंपर्क यामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवला आहे. ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच म्हणून त्यांनी गंधोरा गावात अनेक विकासकामे यशस्वीरीत्या पूर्ण केली असून गावकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे.


कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूरचे संचालक म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार व्यवस्थेत पारदर्शकता आणि नवनवीन सुधारणा घडवून आणण्याचे काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे स्थानिक शेतकऱ्यांना बाजारभाव, तांत्रिक सुविधा आणि आर्थिक सवलतींबाबत योग्य मार्गदर्शन मिळाले आहे.

श्री. भोसले यांनी सांगितले की,“मी महाविकास आघाडीच्या विचारधारेवर आणि जनतेच्या विश्वासावर आधारित विकास करणार आहे. पंचायत समिती ही ग्रामीण भागाच्या प्रगतीचा मुख्य पाया आहे. जनतेच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी, विकासाचे नवे मार्ग खुले करण्यासाठी ही उमेदवारी मी मागत आहे.

त्यांच्या या घोषणेमुळे चिवरी गणात कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक पातळीवर त्यांना मिळणारा व्यापक पाठिंबा लक्षात घेता, येत्या निवडणुकीत ते मजबूत दावेदार ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.