अवैध अफू लागवडीवर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; १२,३३,४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त.



धाराशिव, दि. १७ फेब्रुवारी २०२६ : अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, छत्रपती संभाजीनगर कृती विभागाने मौजे खेड, ता. जि. धाराशिव येथे अवैधरित्या लागवड करण्यात आलेल्या अफू झाडांवर धडक कारवाई करत १२,३३,४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दि. १७/०२/२०२६ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने मौजे खेड येथील शेत गट क्रमांक १४१, १४२, १५३ व १७४ मध्ये छापा टाकला. या ठिकाणी अफू वनस्पतीची बेकायदेशीर लागवड करून तिची देखभाल व रखवाली केली जात असल्याचे आढळून आले.

सदर गट क्रमांकातील शेतकरी लिंबराज पांडुरंग लोमटे, रामहारी नामदेव लोमटे, नरहरी गोविंद लोमटे व ज्ञानेश्वर वसुदेव टकले (सर्व रा. खेड, ता. जि. धाराशिव) यांच्याकडून ही लागवड करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

कारवाईदरम्यान कायदेशीर पंचनामा करून फुले व बोंड्यांसह एकूण ८३ किलो अफू झाडे उपटून जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची किंमत १२,३३,४५० रुपये (बारा लाख तेहतीस हजार चारशे पन्नास रुपये) इतकी आहे.

या प्रकरणी ढोकी पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस. कायदा १९८५ कलम ८(क), १८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे सपोउपनि हनुमान पुरके यांच्या फिर्यादीवरून पुढील तपास सुरू आहे.

सदर कारवाई अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस महानिरीक्षक श्रीमती शारदा राऊत, पोलीस उपमहानिरीक्षक श्री. प्रवीण पाटील, पोलीस अधीक्षक श्री. अजीत टिके, श्री. निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस उपअधीक्षक श्री. साईनाथ ठोंबरे, पोलीस निरीक्षक श्रीमती गीता बागवडे, सपोनि श्रीमती दिपाली पाटील, सपोउपनि वाहेद मुल्ला, सपोउपनि हनुमान पुरके, मपाहेकॉ. शैला टेळे, पोहेकॉ. सुरेश राऊत, पोकॉ. नागेश केंद्रे, पोकॉ. निलेश सरपाळे, कैलास गाडेकर, नितीन जाधव, रविंद्र साळवे, सुरज जोनवाल, ज्ञानेश्वर चव्हाण, हरीचंद्र मुंढे, अमितसिंग ठाकूर, अतुल तुपे, आम्रपाली सूर्यवंशी, ज्योती कितीकर, प्रियंका पवार आदींच्या पथकाने संयुक्तरीत्या ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.




युवा वर्ग नशेच्या आहारी जाऊ नये यासाठी गांजा, अफू, ड्रग्ज यांसारख्या अंमली पदार्थांची बेकायदेशीर लागवड, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे टास्क फोर्सकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी संशयास्पद माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.