तुळजापूर पंचायत समिती कार्यालयातील लिपीक संवर्गाच्या आंदोलनास पंचायत समिती सदस्य किसन भाऊ देडे यांचा ठाम जाहीर पाठिंबा

तुळजापूर येथील पंचायत समिती कार्यालयात लिपीक संवर्गाच्या विविध प्रलंबित व न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या असहकार आंदोलनाला पंचायत समिती सदस्य किसन भाऊ देडे यांनी ठाम जाहीर पाठिंबा दिला आहे. दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू असलेले हे आंदोलन २३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुरू राहणार असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सनदशीर मार्गाने असहकाराची भूमिका घेतली आहे.


लिपीक संवर्गाच्या चौथ्या वेतन आयोगापासून प्रलंबित असलेल्या वेतनश्रेणीतील अधिकारी तफावतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तसेच सुधारित वेतनश्रेणी लागू करणे, जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणे आणि १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अनुकंपा नियुक्तीच्या प्रतीक्षासूचीवरील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन राबविण्यात येत आहे.

यावेळी पंचायत समिती सदस्य किसन भाऊ देडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलक कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, लिपीक संवर्ग हा प्रशासनाचा कणा असून त्यांच्या मागण्या रास्त व न्याय्य आहेत. शासनाने कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा असंतोष वाढण्याची शक्यता आहे.

पंचायत समिती सदस्य किसन भाऊ देडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ते कायम त्यांच्या पाठीशी उभे राहतील व आंदोलनाला त्यांचा संपूर्ण नैतिक व जाहीर पाठिंबा राहील. शासनाने संवादाच्या माध्यमातून तोडगा काढावा, अशीही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.