शिवजयंतीनिमित्त तुळजापूर नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

तुळजापूर : शिवजयंतीच्या पावन निमित्ताने तुळजापूर नगरीत अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा अर्पण करण्यात आला. “प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर महाराजधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!” या जयघोषात शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विधीपूर्वक पूजन व अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी तुळजापूर नगरीचे प्र. नगराध्यक्ष रामचंद्र आबा रोचकरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोधले, सावरकर विचारमंचचे अध्यक्ष बाळासाहेब शामराज, उपाध्यक्ष उमेश गवते तसेच तरुण भारतचे ज्येष्ठ पत्रकार अंबादास पोपळे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण वंदना देण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या महान कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले. शिवाजी महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राज्यकारभार हा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमात जय शिवरायच्या घोषणांनी वातावरण शिवमय झाले असून तुळजापूर शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली.