राज्य शासनाचा जिल्हास्तरीय पुरस्कार तुळजापूर खुर्द येथील तुळजाई मंडळास प्रदान

 



तुळजापूर खुर्द येथील तुळजाई सांस्कृतिक व क्रीडा मंडळास महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक गणेशोत्सव २०२५ अंतर्गत जिल्हास्तरीय राज्य शासनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. धाराशिव येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी मा. श्री. कीर्ती किरण पुजार यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार मंडळास देण्यात आला.
या पुरस्काराचे स्वरूप रुपये ३०,००० रोख व प्रशस्तीपत्र असे आहे. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी मा. श्री. गोडसे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुरस्कार स्वीकारताना मंडळाचे अध्यक्ष श्री. नानासाहेब भोजने, सचिव श्री. विकास भोजने तसेच सदस्य श्री. दिपक माळी उपस्थित होते.
तुळजाई मंडळाचे हे ३७वे वर्ष असून मंडळ वर्गणीमुक्त गणेशोत्सव साजरा करत समाजोपयोगी विविध उपक्रम राबवत आहे. रक्तदान शिबिर, पशुचिकित्सा शिबिर, आरोग्य शिबिर, ज्येष्ठ नागरिकांना रेडिओ वाटप, नदी खोलीकरण, दुष्काळी परिस्थितीत कूपनलिकेद्वारे पाणी उपलब्ध करून देणे, सन १९९७ मध्ये तुळजाई पतसंस्थेची स्थापना करून युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, ‘बँक आपल्या दारी’, मोफत लर्निंग लायसन्स उपक्रम, महिला सक्षमीकरण, ज्येष्ठांना काठी वाटप, तसेच न.प. शाळा क्र. ३ येथे ‘माझी शाळा माझे गुरुजी’ उपक्रम अशा अनेक सामाजिक कार्यांमुळे मंडळाने वेगळी ओळख निर्माण केली आहे.
यापूर्वी सन २००८ मध्ये मंडळास महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच जिल्हा पोलीस दल व रोटरी क्लब यांच्या ‘एक गाव एक गणपती’ उपक्रमासह एकूण २९ विविध पुरस्कारांनी मंडळाचा गौरव करण्यात आला आहे.
सदर पुरस्कार तुळजापूर खुर्द व तुळजापूर शहरातील नागरिकांना समर्पित करण्यात येत असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.