जगभरातून येणाऱ्या भाविकांसाठी तुळजापुरात भव्य ‘VVIP’ विश्रामगृहाला मंजुरी; १६.३५ कोटींचा प्रकल्प लवकरच सुरू! आ राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती

 

तुळजापूर : तीर्थक्षेत्र म्हणून जागतिक पातळीवर लौकिक असलेल्या तुळजाभवानी मंदिर नगरी तुळजापुराच्या विकासाला आणखी एक मोठी चालना मिळाली आहे. देश-विदेशातून येणाऱ्या भाविक, अभ्यासक व मान्यवरांच्या सोयीसाठी तुळजापुरात अत्याधुनिक ‘VVIP’ शासकीय विश्रामगृह उभारण्यास उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिली असून या प्रकल्पासाठी १६ कोटी ३५ लाख रुपयांचा निधीही मान्य करण्यात आला आहे. याबाबतची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत सुमारे ४३८ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची निविदा प्रसिद्ध झाली असून तुळजापुरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. आगामी काळात जगभरातून मोठ्या संख्येने भाविक तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणार असल्याने तुळजापूर हे जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे. याच पार्श्वभूमीवर आधुनिक सुविधा असलेले प्रशस्त VVIP विश्रामगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या अस्तित्वात असलेले शासकीय विश्रामगृह हे सुमारे ५९ वर्षे जुने (१९६७ सालचे) असून वाढत्या भाविकांच्या ओघामुळे ते अपुरे पडत आहे. जुनी व जीर्ण अवस्था लक्षात घेता नवीन, भव्य आणि आधुनिक इमारतीची गरज भासत होती. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या नव्या विश्रामगृहाला अखेर मंजुरी मिळाल्याचे आमदार राणाजगजजितसिंह पाटील यांनी सांगितले.

नवीन VVIP विश्रामगृह सुमारे ३४ हजार चौरस फुट क्षेत्रफळाचे, सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असे उभारले जाणार आहे. हे बांधकाम तुळजापूर येथील विद्यमान शासकीय विश्रामगृहाच्या आवारातच करण्यात येणार असून संबंधित जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची (सिटी सर्व्हे क्र. ९०२) आहे. या ठिकाणी सध्या असलेल्या तीन जुन्या व वापरात नसलेल्या जीर्ण इमारती पाडून नवीन वास्तू उभी केली जाणार आहे.

तुळजापूर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर भाविक आणि व्हीआयपी मान्यवर दर्शनासाठी येतात. त्यामुळे VVIP दर्जाच्या निवास व्यवस्थेची आवश्यकता दीर्घकाळ जाणवत होती. नवीन विश्रामगृह उभारल्यानंतर देशभरातून येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या भाविकांच्या निवासाचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार असून तुळजापूरच्या धार्मिक पर्यटन विकासाला मोठी गती मिळणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या भव्य प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार असून लवकरच प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होणार असल्याचेही सांगण्यात आले.