तुळजापूर येथे राष्ट्रीय लोकअदालत; ७९४ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा तुळजापूर लोकअदालतीत मोठे यश; लाखोंची वसुली, शेकडो प्रकरणे निकाली राष्ट्रीय लोकअदालतीत ४१२३ प्रकरणे ठेवली; ७९४ प्रकरणांत तडजोड


तुळजापूर : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद यांच्या निर्देशानुसार तुळजापूर येथील नूतन न्यायालयीन इमारतीमध्ये दिनांक १४ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले.
या लोकअदालतीचे उद्घाटन सकाळी १०.१५ वाजता मा. श्रीमती एस. डी. अवसेकर, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तथा अध्यक्षा तालुका विधी सेवा समिती, तुळजापूर यांच्या हस्ते तुळजाभवानी मातेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. अविनाश ढोके (२रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, तुळजापूर), मा. अनुपम मुक्कनवार (३रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, तुळजापूर) तसेच ॲड. जयवंत इंगळे, अध्यक्ष, विधिज्ञ मंडळ तुळजापूर उपस्थित होते. याशिवाय विधिज्ञ मंडळातील वकील, न्यायालयीन कर्मचारी तसेच पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तुळजापूर तालुक्यातील प्रलंबित दिवाणी व फौजदारी स्वरूपाची ८५३ प्रकरणे तसेच दावा पूर्व ३२७० प्रकरणे, अशी एकूण ४१२३ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबित ५८ प्रकरणे व दावा पूर्व ७३६ प्रकरणे, अशी एकूण ७९४ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.
प्रलंबित बँक व दावा पूर्व प्रकरणांमध्ये ₹२२,८६,९७५/- इतकी रक्कम संबंधित नगरपरिषद, बँका व ग्रामपंचायतींना वसूल झाली. तसेच फौजदारी स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये आरोपींना दंडात्मक शिक्षा देऊन ₹१४,१५०/- इतका दंड वसूल करण्यात आला. याशिवाय कलम १३८ च्या प्रकरणांमध्ये तडजोड होऊन फिर्यादी पक्षाला ₹९,०७,१९५/- इतकी रक्कम मिळाली.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये अल्पोपहाराची व्यवस्था ॲड. संजय हुनसिंगराव पवार यांनी केली. या लोकअदालतीला पक्षकार, वकील, बँक कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सदर लोकअदालत यशस्वी होण्यासाठी तुळजापूर न्यायालयातील सर्व न्यायिक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी, तुळजापूर विधिज्ञ संघाचे सदस्य तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.