शासकीय कामात अडथळा; ४ जणांवर गुन्हा दाखल

 


नळदुर्ग (ता. तुळजापूर) – शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करत पोलीस कर्मचाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 27 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 9.12 वाजण्याच्या सुमारास निसर्ग हॉटेलजवळ, नळदुर्ग बायपास रोड येथे ही घटना घडली. फिर्यादी पोलीस कर्मचारी दत्तात्रय माणिकराव कुंभार (वय 41) हे आपल्या सहकाऱ्यांसह शासकीय कामकाज करत असताना आरोपींकडून अडथळा निर्माण करण्यात आला.
आरोपी संजय सुभाष जगताप (रा. वानेवाडी, ता. पाटोदा, जि. बीड), सचिन परमेश्वर पवार (रा. कुसळंब, ता. पाटोदा, जि. बीड), सतीश तुकाराम सोंडगे (रा. गवळवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) व मिट्टू उर्फ इंद्रजितसिंग रणजितसिंग ठाकूर (रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी त्यांच्या ताब्यातील आयशर टेम्पो (क्र. MH 16 CD 2395) मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित व मानवी आरोग्यास घातक असलेला गोवा गुटखा वाहतूक करताना पोलिसांना आढळले.
सदर टेम्पोमध्ये गोवा गुटख्याच्या सुमारे 50 मोठ्या गोण्या, एक स्विफ्ट कार व तीन मोबाईल असा एकूण 48 लाख 42 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी कारवाईसाठी वाहन ताब्यात घेत असताना आरोपींनी “गाडी सोडून दे, नाहीतर परिणाम भोगावे लागतील” अशी धमकी देत शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच इतर काही इसमांनीही आरोपींना चिथावणी देऊन कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी दि. 28 मार्च 2026 रोजी दत्तात्रय कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 132, 223, 274, 275, 123, 45, 3(5) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम 59 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.