पवनचक्की व सौर प्रकल्पांमध्ये ८०% स्थानिकांना रोजगार द्या – आरपीआय (खरात) ची मागणी


धाराशिव – प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य स्थानिक व्यक्तींना रोजगार देण्याचा अधिनियम २०१९ व नियम २०२० नुसार औद्योगिक आस्थापनांमध्ये ८० टक्के स्थानिक युवकांना रोजगार देणे बंधनकारक आहे. मात्र धाराशिव जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पवनचक्की (Wind Energy) व सौर ऊर्जा (Solar Energy) प्रकल्पांमध्ये स्थानिक युवकांना अपेक्षित प्रमाणात रोजगार दिला जात नसल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) च्या वतीने करण्यात आली आहे.
दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, धाराशिव, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता अधिकारी, धाराशिव तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव जिल्ह्यातील जमीन, नैसर्गिक संसाधने व पायाभूत सुविधांचा वापर करून उभारण्यात आलेल्या अनेक पवनचक्की व सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये तांत्रिक, कंत्राटी व इतर पदांवर मोठ्या प्रमाणात बाहेरील कामगारांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधीपासून वंचित राहावे लागत असून शासनाच्या ८० टक्के स्थानिक रोजगाराच्या धोरणाला बाधा येत आहे.
प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व पवनचक्की व सौर ऊर्जा प्रकल्पांची विशेष तपासणी करून पदनिहाय व वेतननिहाय स्थानिक व बाहेरील कर्मचाऱ्यांची माहिती मागवावी. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय स्थानिक युवकांची नोंदणी, कौशल्य प्रशिक्षण व रोजगार मेळावे आयोजित करून ८० टक्के स्थानिक रोजगाराची अट प्रत्यक्षात पूर्ण करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.


या निवेदनावर आरपीआय (खरात) जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, तालुकाध्यक्ष संपत सरवदे व बापूराव गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या असून, स्थानिक युवकांना त्यांच्या हक्काचा रोजगार मिळावा यासाठी प्रशासनाने तात्काळ ठोस कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.