धाराशिव शहर काँग्रेसला मोठा धक्का; शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांचा राजीनामा


धाराशिव (उस्मानाबाद) शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अग्निवेश विलासराव शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांनी याबाबत अधिकृत पत्र पाठवले आहे.
दि. 22 मे 2026 रोजी दिलेल्या पत्रात अग्निवेश शिंदे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने शहराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानले आहेत. तसेच शहर व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य केल्याचे नमूद करत त्यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले आहे.
आपल्या पत्रात त्यांनी वैयक्तिक अडचणींमुळे शहराध्यक्ष पदाला योग्य न्याय देता येत नसल्याचे म्हटले असून, इतर कार्यकर्त्यांनाही या पदावर काम करण्याची संधी मिळावी या हेतूने आपण राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले आहे.





काम करताना काही चुका किंवा उणिवा राहिल्या असतील तर त्याची जबाबदारी स्वतःची असल्याचे त्यांनी नमूद केले असून, नकळत कोणाचे मन दुखावले असल्यास क्षमाही मागितली आहे.
अग्निवेश शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे धाराशिव शहर काँग्रेसमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले असून, आगामी काळात शहराध्यक्ष पदाची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.