स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी; अट्टल घरफोड्या आरोपीला अटक, ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त


धाराशिव, दि. 31 मे : धाराशिव जिल्ह्यातील विविध घरफोडी प्रकरणांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अट्टल घरफोड्या करणाऱ्या आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, चारचाकी व दुचाकीसह तब्बल ४५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. ३० मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना गोपनीय माहिती मिळाली की, धाराशिव जिल्ह्यातील अनेक घरफोड्यांमध्ये सहभागी असलेला अजय श्रावण शिंदे हा सुंभा येथे आला आहे. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची पथके तातडीने रवाना झाली.
पोलीस पथकाने संशयिताचा शोध घेत असताना अजय शिंदे याने पोलिसांना पाहताच पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला पकडले. त्याच्यासह श्रावण जमनाशा शिंदे यालाही ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र अजय शिंदे याची कसून चौकशी केली असता त्याने जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील घरफोड्यांची कबुली दिली.
आरोपीने बेंबळी, ढोकी, धाराशिव ग्रामीण, शिराढोण, मुरूम, लोहारा, वाशी, परंडा, येरमाळा आणि आनंदनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण ३२ घरफोडीचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली.
चौकशीदरम्यान आरोपीकडून घरफोडीतील सुमारे १८ तोळे सोने जप्त करण्यात आले. तसेच चोरीच्या मालातील काही सोने विकून मिळालेल्या पैशातून त्याने एक ब्रेझा चारचाकी वाहन व एक नवीन बुलेट दुचाकी खरेदी केल्याचेही उघड झाले. पोलिसांनी एकूण ४५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.