चिकुंद्रा येथील रिन्यू पॉवर विंडमिल कंपनीच्या विद्युत पोल नुकसान प्रकरणातील दोन्ही आरोपींना जामीन मंजूर



तुळजापूर : चिकुंद्रा येथील बहुचर्चित रिन्यू पॉवर विंडमिल कंपनीच्या विद्युत पोल नुकसान प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रमेश गायकवाड व विजय गरड यांना माननीय जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
सदर प्रकरणात रिन्यू पॉवर विंडमिल कंपनीकडून नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. कंपनीच्या तक्रारीनुसार, दि. 15 मे 2026 रोजी मौजे चिंचपूर परिसरात कंपनीच्या विद्युत वाहिनीच्या पोलचे जेसीबीच्या सहाय्याने नुकसान करण्यात आले. या घटनेत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा कंपनीने केला होता. तसेच पोल विद्युत प्रवाहित असताना खोदकाम केल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
तक्रारीनुसार आरोपी दत्तात्रय गायकवाड यांनी 2024 मध्ये कंपनीसाठी पोल उभारणीचे काम केले होते. मात्र त्या कामाचे पैसे कंपनीने दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. या वादातूनच संबंधित पोल पाडल्याचा दावा फिर्यादीकडून करण्यात आला होता.
दरम्यान, आरोपींच्या वतीने ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयास सांगितले की, सदर कंपनी पवनचक्की प्रकल्पासाठी शेतकऱ्यांसोबत करार करूनही त्यांना योग्य मोबदला देत नाही. सामान्य शेतकऱ्यांची फसवणूक होत असून कंपनीच्या मनमानी विरोधात आवाज उठवल्यामुळे आरोपींना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले असल्याचा दावा त्यांनी केला.
तसेच आरोपी तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार असून न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन करतील, असा युक्तिवादही बचाव पक्षाकडून करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत माननीय जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला.
सदर प्रकरणात ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांना ॲड. मंजुषा विशाल साखरे, ॲड. महेश लोहार, ॲड. शुभम तांबे, ॲड. अर्चना कांबळे, ॲड. अमित गोळे, ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, ॲड. संकेत गोरे, ॲड. ओंकार कोरेगावकर, ॲड. रोहित लोमटे, ॲड. पृथ्वीराज खोचरे व महेश पवार यांनी सहकार्य केले.