पोलीस विभागातील मोटर परिवहन विभागामार्फत श्री संत गजानन महाराज दिंडीतील वारकऱ्यांना केळी व पाणी बाटल्यांचे वाटप

आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त महाराष्ट्राची शतकानुशतके जपली गेलेली पंढरपूर वारी परंपरा मोठ्या भक्तिभावाने पार पडत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज तसेच श्री संत गजानन महाराज यांच्या पालख्यांसह लाखो वारकरी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरकडे प्रस्थान करतात.
याच पार्श्वभूमीवर आज दि. 15 जुलै 2026 रोजी, पोलीस अधीक्षक कार्यालय, धाराशिव येथे मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी जपत श्री संत गजानन महाराज दिंडीतील वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत पोलीस विभागातील मोटर परिवहन विभागाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्वखर्चाने वारकऱ्यांना केळी व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. वारकऱ्यांच्या सेवेसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे वारकऱ्यांनी स्वागत करत पोलीस विभागाचे आभार मानले.
वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा या भावनेतून पोलीस विभागाने केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.