बलात्कार व ॲट्रॉसिटी प्रकरणातील आरोपींची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता


बलात्कार व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक 54/2022 मधील आरोपींची माननीय जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
सदर प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 376, 376(2), 506, 109 तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 मधील कलम 3(1)(w) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) कार्यालयामार्फत करण्यात आला होता.
सरकार पक्षाने दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयात एकूण आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. बचाव पक्षाच्या वतीने ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी प्रभावी बाजू मांडत सरकार पक्षाच्या सर्व साक्षीदारांची सखोल उलटतपासणी केली.
बचाव पक्षाच्या युक्तिवादानुसार, फिर्याद जाणीवपूर्वक उशिराने दाखल करण्यात आली होती. तसेच फिर्यादीने आरोपींना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या उद्देशाने तक्रार दिल्याचे न्यायालयासमोर मांडण्यात आले. उलटतपासणीत साक्षीदारांनी मान्य केलेल्या बाबी, वैद्यकीय पुरावे (Medical Evidence) तसेच न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेल्या नमुन्यांमधून आरोपींविरुद्ध कोणताही ठोस व निर्णायक पुरावा सिद्ध होत नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला.
संपूर्ण पुरावे, साक्षीदारांची साक्ष, उलटतपासणी आणि दोन्ही पक्षांचा युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर सरकार पक्ष आरोपींविरुद्ध आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. त्यानुसार माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. ठुबे यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
सदर प्रकरणात ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांना ॲड. मंजुषा विशाल साखरे, ॲड. महेश लोहार, ॲड. अमित गोळे, ॲड. शुभम तांबे, ॲड. संकेत गोरे, ॲड. अर्चना कांबळे, ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, ॲड. आकाश एडके, ॲड. ओंकार कोरेगावकर, ॲड. रोहित लोमटे, ॲड. पृथ्वीराज खोचरे आणि ॲड. महेश पवार यांनी सहकार्य केले.