शालेय व्यवस्थापन समितींमार्फतच गणवेश खरेदी व वाटप करा; विद्यार्थ्यांना तात्काळ गणवेश द्या, अन्यथा आंदोलन – धाराशिव काँग्रेस



धाराशिव : शालेय विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार तात्काळ गणवेशाचे वाटप करण्यात यावे तसेच गणवेश खरेदी व वितरणाचा अधिकार शालेय व्यवस्थापन समितीमार्फतच राबविण्यात यावा, या मागणीसाठी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात, शैक्षणिक वर्ष सुरू होऊन बराच कालावधी उलटूनही जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेला नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आणून देण्यात आली. गणवेशाअभावी विद्यार्थी व पालकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शासनाच्या निर्णयानुसार गणवेश खरेदी व वितरणाची जबाबदारी शालेय व्यवस्थापन समित्यांकडेच असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशी ठाम मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना तातडीने गणवेश उपलब्ध करून न दिल्यास किंवा शालेय व्यवस्थापन समितीचे अधिकार डावलण्याचा प्रयत्न झाल्यास जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्यासह राजेंद्र शेरखाने, धनंजय राऊत, खलील सय्यद, सलमान शेख, गोरोबा झेंडे आणि बालाजी राठोड उपस्थित होते.