तुळजापूरमध्ये कारची काच फोडून दीड लाखांची रोकड लंपास; गुन्हा दाखल


तुळजापूर : तुळजापूर शहरातील घाटशिळ पार्किंग परिसरात उभी असलेल्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्याने दीड लाख रुपयांची रोकड व महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागराज सदानंद मडीवाळ (वय 29), रा. चिंचवाडा गाव पाली, ता. बिचोली नॉर्थ, जि. नॉर्थ गोवा हे त्यांच्या स्कोडा स्लाविया (क्र. GA 04 E 9156) या कारमधून तुळजापूर येथे आले होते.
दि. 19 जुलै 2026 रोजी सकाळी 11.30 ते सायंकाळी 6.00 या कालावधीत घाटशिळ पार्किंग, स्मशानभूमी रोड, इदगाहजवळ उभी असलेल्या कारच्या डाव्या बाजूची काच फोडून अज्ञात चोरट्याने कारमधील पर्स चोरून नेली. त्या पर्समध्ये ₹1,50,000 रोख रक्कम तसेच महत्त्वाची कागदपत्रे होती.
याप्रकरणी फिर्यादी नागराज मडीवाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास तुळजापूर पोलीस करीत आहेत.