तुळजापूरच्या १ते ११ प्रभागांसाठी विकासकामांचा अजेंडा; नगरसेवक मधुकर शेळकेंचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन स्वच्छतागृहे, व्यापारी गाळे, सीसीटीव्ही अन् महापुरुषांच्या पुतळ्यांसाठी तातडीने पाठपुराव्याची मागणी

 



तुळजापूर : प्रतिनिधी रुपेश डोलारे..


तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक १ ते ११ मधील विविध नागरी प्रश्न मार्गी लावण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मधुकर बबनराव शेळके यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे सहा प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. शहरातील मूलभूत सुविधा आणि विकासकामांना गती देऊन नागरिकांच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी, अशी मागणी त्यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक १ ते ११ मधील सुमारे १५ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली सुलभशौचालये कालबाह्य झाली असल्याने त्यांचे नूतनीकरण करून नवीन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच नळदुर्ग रोड, धाराशिव रोड, लातूर रोड, सोलापूर रोड, वेताळनगर झोपडपट्टी आणि कुंभार गल्ली या परिसरांत नगरपरिषदेच्या माध्यमातून नवीन व्यापारी गाळे उभारून स्थानिक नागरिकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.








◾जिजाऊ माँसाहेबांच्या पुतळ्याचा मुद्दा ऐरणीवर
तुळजापूर शहरात जिजाऊ माँसाहेबांचा पुतळा उभारण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी नगरसेवक शेळके यांनी केली आहे. त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यांबाबतही संबंधित स्तरावर तातडीने पाठपुरावा करण्याची मागणी त्यांनी केली.
◾मुख्य चौकांवर सीसीटीव्हीची मागणी
शहरातील वाढती वर्दळ आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता प्रभाग १ ते ११ मधील प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. यामुळे गुन्हेगारीला आळा घालण्यास तसेच वाहतूक आणि सार्वजनिक सुरक्षेवर लक्ष ठेवण्यास मदत होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, तुळजापूर खुर्द येथील रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर नगरपरिषदेच्या माध्यमातून लोकहिताच्या दृष्टीने व्यापारी संकुलासाठी गाळे उभारावेत, अशी मागणीही नगरसेवक शेळके यांनी केली आहे.
शहरातील सर्व प्रलंबित प्रश्नांवर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने पाठपुरावा करून विकासकामांना गती द्यावी, अशी मागणी करत निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच तुळजापूर नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनाही देण्यात आली आहे.