अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

तुळजापूर : तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात 16 वर्षे 6 महिन्यांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीचे नाव व गाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 17 किंवा 18 जुलै 2026 रोजी रात्री अंदाजे 1 ते 1.30 वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणाने ‘माझे तुझ्याकडे काम आहे’ असा बहाणा करून अल्पवयीन मुलीला आपल्या घरी बोलावून घेतले. त्यानंतर तिला तसेच तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
तसेच संबंधित तरुणाने पीडितेचा वारंवार पाठलाग करून तिचे छायाचित्रण व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी पीडितेने दि. 09 ऑगस्ट 2026 रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या प्रथम खबरेवरून भारतीय न्याय संहिता कलम 65(1), 78, 351(2), 351(3) तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 4 व 12 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करीत आहेत.