मंगरूळ गटातील विकासकामे, सेमी इंग्रजी धोरणाचा फेरविचार, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आणि आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी तुळजापूर प्रतिनिधी : धाराशिव जिल्हा परिषदेच्या मंगरूळ गटातील विविध नागरी समस्या, आरोग्य सुविधा, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत जिल्हा परिषद सदस्या सौ. सिमाताई भैरवनाथ माडजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), जिल्हा आरोग्य अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन विविध मागण्यांची निवेदने सादर केली.
आरळी बु. येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याची मागणी मौजे आरळी बु. (ता. तुळजापूर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) मंजूर करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा प्रस्ताव तातडीने मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी मागणी सौ. माडजे यांनी केली.
तसेच मंगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात बंद करण्यात आलेल्या HbA1c, Vitamin B-12 आणि Vitamin D-3 या महत्त्वाच्या रक्तचाचण्या पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. मंगरूळ PHCसह चिंचोली, आरळी बु., कुंभारी, तीर्थ खुर्द, ढेकरी आणि बोरी येथील आरोग्य उपकेंद्रे तसेच कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरुस्ती करून आवश्यक ठिकाणी नवीन स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. सेमी इंग्रजी धोरणाचा फेरविचार करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी लागू करण्यात आलेल्या सेमी इंग्रजी धोरणाबाबतही सौ. माडजे यांनी प्रश्न उपस्थित केला. अचानक धोरण लागू केल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर आणि आत्मविश्वासावर परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
शैक्षणिक वर्ष सुरू होऊन एक महिना उलटला असतानाही शिक्षकांना सेमी इंग्रजीचे आवश्यक प्रशिक्षण मिळालेले नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तज्ज्ञ शिक्षक, डायटचे प्राचार्य आणि शिक्षणाधिकारी यांची समिती गठीत करून नियोजनबद्ध पद्धतीने सेमी इंग्रजीचे धोरण राबवावे, अशी मागणी त्यांनी केली. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवरही आवाज धाराशिव जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीने दिलेल्या इशारा पत्राची दखल घेत सौ. माडजे यांनी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रियेतील अनियमितता दूर करून सेवाज्येष्ठतेनुसार पारदर्शक पदोन्नती प्रक्रिया राबवावी. तसेच निवडश्रेणी, जुनी पेन्शन योजना, भाषा तसेच गणित-विज्ञान पदवीधर शिक्षकांची पदे भरणे, कोरोना काळातील जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण आणि एक कोटी रुपयांपेक्षा अधिक जमा निधीचा पारदर्शक विनियोग करण्याची मागणी करण्यात आली. मंगरूळ गटातील रस्त्यांसाठी निधीची मागणी मंगरूळ जिल्हा परिषद गटातील विविध रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी डीपीडीसी व जिल्हा नियोजन समितीअंतर्गत निधी उपलब्ध करून अंदाजपत्रके तयार करावीत, अशी मागणी करण्यात आली. यामध्ये काळगाव पाटी ते काळगाव सिमेंट रस्ता, मंगरूळ ते धनेगाव, मंगरूळ ते खंडाळकरवाडी, आरळी खुर्द ते आरळी बुद्रुक, कसई ते काळगाव, रायखेल ते कुंभारी डांबरी रस्ता, बिजनवाडी ते देवासिंगा रस्ता, तीर्थ खुर्द ते सरडेवाडी/खोताचीवाडी रस्ता तसेच तीर्थ बुद्रुक येथे सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम या कामांचा समावेश आहे. रायखेल-कुंभारी, बिजनवाडी-देवासिंगा आणि तीर्थ खुर्द-सरडेवाडी/खोताचीवाडी या रस्त्यांसाठी प्रत्येकी सुमारे ५० लाख रुपये, तर तीर्थ बुद्रुक येथील सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकामासाठी सुमारे १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
“मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन” “मंगरूळ गटातील नागरिकांचे आरोग्य, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य आणि ग्रामीण भागातील रस्ते या माझ्या प्राथमिक गरजा आहेत. प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष न करता तात्काळ निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी. अन्यथा नागरिकांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन उभारण्यात येईल,” असा इशारा जिल्हा परिषद सदस्या सौ. सिमाताई भैरवनाथ माडजे यांनी दिला.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.