मारहाण व ॲट्रॉसिटी प्रकरणात घाटंग्री येथील उपसरपंचासह आई-वडिलांची निर्दोष मुक्तता

धाराशिव : मारहाण व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात घाटंग्री येथील ग्रामपंचायत उपसरपंच व त्यांच्या आई-वडिलांची धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.
सन २०२० मध्ये पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीनुसार, आरोपीच्या घागरीला फिर्यादीचा पदर लागल्याच्या कारणावरून घागरीतील पाणी सांडले तसेच जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. तसेच राजाराम पवार यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०/२०२० अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३, ५०४, ५०६, ३४ तसेच ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात आरोपी क्रमांक १ ते ३ यांच्या वतीने ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी बचाव पक्षाची बाजू मांडली. सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने फिर्यादी व तिचे पती राजकारणात सक्रिय असून आरोपी हे राजकीय विरोधक असल्याने राजकीय द्वेषातून खोटी फिर्याद दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद केला.
बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास काही महत्त्वाचे मुद्दे आणले. त्यामध्ये फिर्यादी राजकीयदृष्ट्या सक्रिय असून ग्रामपंचायत पदाधिकारी असल्याचे, आरोपी विरोधक असल्याचे तसेच गावात २०१८-१९ मध्ये मोठी पाण्याची टाकी बांधण्यात आली असून त्यावरून गावाला पाणीपुरवठा होत असल्याने फिर्यादीने सांगितलेल्या घटनेबाबत संशय निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले.
तसेच कथित घटनेत वापरण्यात आलेली घागर पोलिसांनी जप्त केलेली नसल्याचे, पोलिस तपासामध्ये त्रुटी असल्याचे व पंचनाम्यांबाबतही बचाव पक्षाने प्रश्न उपस्थित केले.
बचाव पक्षाचा युक्तिवाद व प्रकरणातील पुरावे विचारात घेऊन माननीय विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. खोमणे यांनी तिन्ही आरोपींची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांना ॲड. मंजुषा विशाल साखरे, ॲड. महेश लोहार, ॲड. शुभम तांबे, ॲड. अमित गोळे, ॲड. आकाश एडके, ॲड. संकेत गोरे, ॲड. ओंकार कोरेगावकर, ॲड. अर्चना कांबळे, ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, ॲड. रोहित लोमटे आणि ॲड. पृथ्वीराज खोचरे यांनी सहकार्य केले.