निर्घृण खून प्रकरणातील दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता तुळजापूर येथील खून खटल्यात बचाव पक्षाचा युक्तिवाद ठरला निर्णायक; अॅड. विशाल प्रभाकर साखरे यांचा प्रभावी युक्तिवाद
तुळजापूर : तुळजापूर पोलीस ठाणे हद्दीत सन २०२१ मध्ये घडलेल्या निर्घृण खून प्रकरणातील दोन्ही आरोपींची जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सदर प्रकरणात आरोपींच्या वतीने अॅड. विशाल प्रभाकर साखरे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११३/२०२१ अन्वये कलम ३०२, २०१, १२०(ब) सह ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा सत्र खटला क्रमांक ५७/२०२१ असा होता. नेमके प्रकरण काय? अभियोक्त्याच्या म्हणण्यानुसार, मयत व्यक्तीने बंदूक विकत देण्याच्या कारणावरून आरोपींकडून पैसे घेतले होते. मात्र बंदूक उपलब्ध करून न दिल्याने आरोपींनी मयतासोबत दारू घेतल्यानंतर अज्ञात ठिकाणी नेऊन कोयता व गुप्तीने त्याच्यावर वार करून हत्या केल्याचा आरोप होता. दि. २३ मार्च २०२१ रोजी मयत व्यक्ती कामावरून परतल्यानंतर सायंकाळी सुमारे ७ वाजता आरोपींना भेटण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर रिक्षातून तुळजापूर येथील वाईन शॉपमधून दारू खरेदी करण्यात आली आणि पुढे आरोपी व मयत अज्ञात ठिकाणी गेल्याचा तपास यंत्रणेचा दावा होता. त्यानंतर मयताचा निर्घृण खून झाल्याचे पोलिसांना कळविण्यात आले. बचाव पक्षाचा प्रभावी युक्तिवाद या प्रकरणात आरोपींना जवळपास पाच वर्षे अंडरट्रायल म्हणून राहावे लागले. आरोपींच्या वतीने अॅड. विशाल प्रभाकर साखरे यांनी सरकार पक्षाच्या साक्षीदारांची कसून उलटतपासणी करत तपासातील विविध त्रुटींवर न्यायालयाचे लक्ष वेधले. बचाव पक्षाने आरोपींना केवळ संशयावरून गुंतवण्यात आल्याचा युक्तिवाद केला. तसेच आरोपींना अटकेची कारणे सांगण्यात आली नसल्याचा, अटक करताना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. पोलिसांनी केलेले जप्ती पंचनामे, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, कपडे जप्ती पंचनामा तसेच इतर पंचनाम्यांच्या विश्वासार्हतेवरही बचाव पक्षाने प्रश्न उपस्थित केले. फिर्यादीने प्रत्यक्ष घटना पाहिलेली नसून फिर्याद ही संशयावर आधारित असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. घटनास्थळ निर्मनुष्य असल्याने खून होताना पाहिलेला कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याचेही बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. रिक्षाचालक, वाईन शॉप/बारमधील साक्षीदार तसेच पानटपरी चालक यांच्या साक्षींमधून सरकार पक्षाच्या आरोपांना अपेक्षित बळकटी मिळत नसल्याचा दावा बचाव पक्षाने केला. डॉग स्कॉडच्या तपासावरही उलटतपासणी तपासादरम्यान पोलिसांनी डॉग स्कॉडच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अॅड. विशाल प्रभाकर साखरे यांनी डॉग स्कॉडशी संबंधित साक्षीदारांची प्रभावी उलटतपासणी करून तपास प्रक्रियेतील बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी, पोलीस यंत्रणा तसेच फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या अहवालासंदर्भातील बाबींवरही बचाव पक्षाने सविस्तर युक्तिवाद केला. पोलिस तपास, पंचनामे, वैद्यकीय पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांमध्ये असलेल्या त्रुटी न्यायालयासमोर मांडण्यात आल्या. बचाव पक्षाने मयताचा खून अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणातून केला असण्याची शक्यता मांडली. आरोपींचा गुन्ह्याशी थेट संबंध सिद्ध करणारा ठोस व विश्वासार्ह पुरावा सरकार पक्षाकडून सिद्ध झाला नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाचा निर्णय बचाव पक्षाच्या युक्तिवादाचा विचार करून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. खोमणे यांनी सदर खटल्यातील दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात अॅड. विशाल प्रभाकर साखरे यांना अॅड. मंजुषा विशाल साखरे, अॅड. महेश लोहार, अॅड. शुभम तांबे, अॅड. अमित गोळे, अॅड. आकाश एडके, अॅड. संकेत गोरे, अॅड. ओंकार कोरेगावकर, अॅड. अर्चना कांबळे, अॅड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, अॅड. रोहित लोमटे आणि अॅड. पृथ्वीराज खोचरे यांनी मोलाचे सहकार्य केले.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.