तुळजापूरमध्ये खंडणीच्या मागणीवरून दुकानदारास मारहाण; ७,५०० रुपये बळजबरीने घेतले


तुळजापूर : तुळजापूर शहरातील बागवान शॉपिंग सेंटर येथे खंडणीची मागणी करून दुकानदारास शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार लक्ष्मीकांत भिसे व करण संतोष परदेशी, दोघेही रा. तुळजापूर, यांनी दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजता बागवान शॉपिंग सेंटरमधील कपडे शिवण्याच्या दुकानात जाऊन फिर्यादी संतोष विनायक जाधव (वय ४५, रा. ताकविकी, ता. जि. धाराशिव) यांच्याकडे १० हजार रुपयांची मागणी केली.
यावेळी जाधव यांनी पैसे कशासाठी व का द्यायचे, अशी विचारणा केली असता आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर फिर्यादीच्या खिशातील ७,५०० रुपये बळजबरीने काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी संतोष जाधव यांनी दि. ११ सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तुळजापूर पोलिस करीत आहेत.