शारदीय नवरात्र कार्यक्रम पत्रिकेत आमदार, नगराध्यक्षांचा सन्मानपूर्वक उल्लेख करा! ‘लोकप्रतिनिधींचा अपमान म्हणजे जनतेचा अपमान’; जनहित संघटनेचे मंदिर संस्थानला निवेदन, अन्यथा ‘बोंब मारो’ आंदोलन



तुळजापूर, प्रतिनिधी : रुपेश डोलारे 
शारदीय नवरात्र महोत्सव २०२६ च्या कार्यक्रम पत्रिकेत आमदार आणि नगराध्यक्ष या लोकप्रतिनिधींच्या पदांचा सन्मानपूर्वक उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी जनहित संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजय साळुंके व अध्यक्ष प्रशांत कदम सोंजी यांनी जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि तहसीलदार तथा व्यवस्थापक यांना निवेदन दिले आहे.
संघटनेच्या निवेदनानुसार, यापूर्वी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेत संबंधित लोकप्रतिनिधींच्या पदांचा उल्लेख करण्यात येईल, असे मंदिर संस्थानकडून लेखी कळविण्यात आले होते. मात्र, शारदीय नवरात्र महोत्सव २०२६ च्या कार्यक्रम पत्रिकेत आमदार तसेच नगराध्यक्ष या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या पदांचा उल्लेख करण्यात आलेला नसल्याचा आरोप जनहित संघटनेने केला आहे.
‘लोकप्रतिनिधींचा सन्मान राखावा’
लोकप्रतिनिधी हे जनतेचे प्रतिनिधित्व करीत असल्याने अधिकृत कार्यक्रम पत्रिकेत त्यांच्या पदाचा सन्मानपूर्वक उल्लेख करणे आवश्यक असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. लोकप्रतिनिधींच्या पदाचा उल्लेख न करणे हा केवळ संबंधित लोकप्रतिनिधींचाच नव्हे, तर त्यांच्यामागे असलेल्या जनतेच्या प्रतिनिधित्वाचा अवमान असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय व्यवस्थेत लोकप्रतिनिधींचेही स्थान असून, प्रशासकीय सदस्य तसेच इतर मान्यवरांप्रमाणे आमदार आणि नगराध्यक्ष या लोकप्रतिनिधींच्या पदांचाही कार्यक्रम पत्रिकेत योग्य व सन्मानपूर्वक उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
कार्यक्रम पत्रिका पुनर्मुद्रित करण्याची मागणी
शारदीय नवरात्र महोत्सव २०२६ ची कार्यक्रम पत्रिका आवश्यक दुरुस्तीसह पुनर्मुद्रित करण्यात यावी आणि त्यामध्ये संबंधित लोकप्रतिनिधींच्या पदांचा योग्य व सन्मानपूर्वक उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी जनहित संघटनेने केली आहे.
या मागणीची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
अन्यथा ‘बोंब मारो’ आंदोलनाचा इशारा
कार्यक्रम पत्रिकेतील या बाबीची तातडीने दखल घेऊन योग्य ती दुरुस्ती करण्यात आली नाही, तर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यपद्धतीविरोधात ‘बोंब मारो’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जनहित संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.



नवरात्र महोत्सव हा तुळजापूरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा धार्मिक उत्सव असून, या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थान, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयाने कामकाज होणे अपेक्षित आहे. त्यामुळे कार्यक्रम पत्रिकेतील लोकप्रतिनिधींच्या पदांच्या उल्लेखाच्या मुद्द्यावर मंदिर संस्थान आणि प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.