पावसाने दांडी मारल्याने सोयाबीनचे पीक वाया; शेतकऱ्यांनी अखेर पीक रोटरून टाकले



तुळजापूर, दि. १० सप्टेंबर २०२६ :
तुळजापूर तालुक्यात पावसाने तब्बल ३० ते ४० दिवस दांडी मारल्याने खरीप हंगामातील सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी पीक पूर्णपणे वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, डोळ्यांसमोर उभे पीक नष्ट होताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
दि. १० सप्टेंबर रोजी शेतकरी महादेव जाधव व समाधान जाधव यांनी आपल्या शेतातील सोयाबीनचे पीक अखेर रोटरून टाकले. दोन्ही शेतकऱ्यांची मिळून जवळपास ३ ते ४ एकर सोयाबीन होती. मात्र पावसाने दीर्घकाळ दांडी मारल्यामुळे पिकाची वाढ खुंटली आणि अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता मावळली.

शेतकऱ्यांनी मेहनत, पैसा आणि वेळ खर्च करून पिकवलेले सोयाबीनचे पीक हातचे गेल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे शासनाने या नुकसानीची तातडीने दखल घेऊन नुकसानीचे पंचनामे करावेत तसेच पात्र शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पावसाअभावी निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची गरज आहे.