स्वाधार योजनेतील मनमानी कारभार व तांत्रिक अडचणींविरोधात धाराशिवमध्ये खळबळ; दोषींवर कठोर कारवाईची मागणी.

 

धाराशिव, दि. २६ ऑक्टोबर २०२६.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही अनुसूचित जातीच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणारी महत्त्वाची शासकीय योजना आहे. मात्र धाराशिव येथील समाजकल्याण विभागाच्या कार्यपद्धतीमुळे पात्र विद्यार्थ्यांना लाभापासून वंचित राहावे लागत असल्याच्या गंभीर तक्रारी करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कागदपत्रे, बोनाफाईड प्रमाणपत्र, उपस्थिती प्रमाणपत्र, घरभाडे करारपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे सादर करूनही गृहभेटी व स्थळपाहणीच्या नावाखाली अडवणूक केली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. शासकीय योजनेचा लाभ देणे हे प्रशासनाचे कर्तव्य असताना कार्यालयीन प्रक्रियेच्या नावाखाली त्रास देणे, अर्ज प्रलंबित ठेवणे हा गंभीर प्रशासकीय प्रकार आहे.



तसेच स्वाधार योजनेचे ऑनलाइन संकेतस्थळ व्यवस्थित कार्यरत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करता येत नाहीत व अर्ज सादर करण्यात अडचणी येत आहेत. सप्टेंबर २०२६ मध्येही तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता आले नव्हते, तरीही प्रशासनाने ठोस कार्यवाही केलेली नाही.
या पार्श्वभूमीवर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण धाराशिव येथील अधिकारी सचिन कवले यांच्या कार्यकाळातील संपूर्ण इतर योजनेसाठी अर्ज पडताळणी, गृहभेटी, स्थळपाहणी व लाभ वितरण प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. गृहभेटीसंदर्भातील शासन निर्णय, परिपत्रक किंवा लेखी आदेशाची प्रमाणित प्रत उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी आहे.
प्रलंबित व नामंजूर करण्यात आलेले सर्व अर्ज पुनर्तपासून पात्र विद्यार्थ्यांना लाभ मंजूर करावा, संकेतस्थळ तातडीने सुरळीत करावे, अर्जासाठी सुधारित मुदत जाहीर करावी आणि ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याबाबत लेखी आदेश काढावेत, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.


केवळ आश्वासने न देता तातडीने ठोस कार्यवाही न झाल्यास वरिष्ठ कार्यालयाकडे कायदेशीर पाठपुरावा करून तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हे निवेदन मुख्य सचिव, प्रधान सचिव (सामाजिक न्याय), आयुक्त (समाजकल्याण, पुणे), विभागीय उपआयुक्त, जिल्हाधिकारी धाराशिव व सहाय्यक आयुक्त, धाराशिव यांना सादर करण्यात आले यावेळी निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे मा.जिल्हा संघटक विकास बनसोडे,आर.पी.आय.(खरात) जिल्हाध्यक्ष राजा राऊत, रिपब्लिकन सेनेचे महासचिव, भाई फुलचंद गायकवाड (पाटील)आरपीआय(आठवले) तालुकाध्यक्ष भालचंद्र कठारे, स्वाभिमानी संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान सरवदे, बाळू भोसले गायकवाड, मल्हारी साबळे, राजेंद्र कोथिंबिरे, प्रमोद राऊत, सुनील वाघमारे,यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत