तुळजाभवानी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची सूचना! तुळजापूर परिसरात २६ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीत बदल सात ते आठ लाख भाविकांची गर्दी अपेक्षित; १४ मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली



तुळजापूर | प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर.


श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव २०२६ निमित्त तुळजापूर येथे देशभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत. विशेषतः २५ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आणि २६ ऑक्टोबर रोजी मंदिर पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांतून लाखो भाविक पायी तुळजापूरकडे येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता, वाहतूक कोंडी टाळणे आणि अपघात रोखण्यासाठी धाराशिव जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाने वाहतुकीच्या मार्गात बदल करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्हादंडाधिकारी कीर्ती किरण पुजार (भा.प्र.से.) आणि पोलीस अधीक्षक रितू खोखर (भा.पो.से.) यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३(१)(ब) अन्वये हे निर्देश जारी केले आहेत.
२३ ते २६ ऑक्टोबरदरम्यान वाहतूक निर्बंध
जारी केलेल्या जाहिरनाम्यानुसार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून २६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत तुळजापूर शहरातून जाणाऱ्या तसेच शहराकडे येणाऱ्या काही प्रमुख मार्गांवर हलक्या व जड वाहनांच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. या कालावधीत धाराशिव–तुळजापूर–नळदुर्ग, धाराशिव–तुळजापूर–तामलवाडी, तुळजापूर–सोलापूर आणि तुळजापूर–बार्शी या मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
वाहनांसाठी पर्यायी मार्ग
धाराशिव–हैदराबाद: धाराशिव–औसा–उमरगा मार्गे.
हैदराबाद–धाराशिव: उमरगा–औसा मार्गे.
हैदराबाद–छत्रपती संभाजीनगर: उमरगा–औसा–लातूर–अंबाजोगाई–मांजरसुंबा–बीड मार्गे; पर्यायी मार्ग म्हणून उमरगा–औसा–लातूर–मुरुड–ढोकी–येडशी–बीड.
छत्रपती संभाजीनगर–हैदराबाद: बीड–मांजरसुंबा–अंबाजोगाई–लातूर–औसा–उमरगा मार्गे; पर्यायी मार्ग म्हणून बीड–येडशी–ढोकी–मुरुड–लातूर–औसा–उमरगा.
धाराशिव–सोलापूर: धाराशिव–वैराग मार्गे.
लातूर–सोलापूर: मुरुड–ढोकी–येडशी–बार्शी मार्गे.
छत्रपती संभाजीनगर–सोलापूर: येरमाळा–बार्शी मार्गे.
तुळजापूर–सोलापूर: मंगरुळ पाटी–इटकळ–बोरामणी मार्गे.
तुळजापूर–बार्शी: तुळजापूर–धाराशिव मार्गे.
या मार्गांवरील विरुद्ध दिशेच्या वाहतुकीसाठीही जाहिरनाम्यात पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
अत्यावश्यक सेवांना सूट
वाहतूक निर्बंधांमधून पोलीस वाहने, रुग्णसेवा व रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने आणि एसटी बसेस यांना सूट देण्यात आली आहे.
नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पायी चालत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.


AR न्यूज मराठी | तुळजापूर, धाराशिव