नळदुर्ग बायपासवर कंटेनरची भाविकांना धडक; एकाचा मृत्यू, सहा जखमी! रायता हॉटेलजवळ भीषण अपघात; तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला



नळदुर्ग | प्रतिनिधी रुपेश डोलारे 
मुंबई–हैदराबाद महामार्गावरील नळदुर्ग बायपास रोडवर रायता हॉटेलजवळ शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात गुरु सिद्ध बाबुराव कुंभार (रा. बसवकल्याण) यांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील बसवकल्याण येथून तुळजापूरच्या आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविक पायी जात होते. याचदरम्यान हैदराबादहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर क्रमांक MH 04 NB 9671 ची भाविकांना धडक बसल्याने हा अपघात घडला. सकाळी ८.५५ वाजण्याच्या सुमारास अपघाताची माहिती मिळाली.
संस्थानच्या रुग्णवाहिकेची घटनास्थळी धाव
अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नळदुर्ग पॉईंटवरील रुग्णवाहिकेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेचे चालक सुनील भोळे यांनी जखमींना तातडीने मदत केली. संस्थानच्या रुग्णवाहिकेतून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच १०८ रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या मदतीने इतर जखमींनाही रुग्णालयात नेण्यात आले.
तीन जखमींची नावे समोर
या अपघातात जखमी झालेल्या भाविकांमध्ये संगमेश्वर बसवराज बेलुरे (वय ३३), रोहन दशरथराव हाचाटे (वय ३९) आणि महादेव रामलिंगय्या मठपती (वय २१) यांचा समावेश आहे. हे तिघेही बसवकल्याण तालुका, जिल्हा बिदर, कर्नाटक येथील रहिवासी आहेत. अन्य जखमींची नावे उपलब्ध झालेली नाहीत.
तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी श्रद्धेने पायी निघालेल्या भाविकांच्या प्रवासात या अपघातामुळे दुःखद घटना घडली आहे. अपघाताचे नेमके कारण आणि पुढील तपासाबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.