तुळजापूरच्या मयुरेश म्हेत्रेची राज्यस्तरीय क्रिकेट निवड चाचणीसाठी निवड; ग्रामीण भागातून चमकदार कामगिरी! अकॅडमीचे प्रशिक्षण नसतानाही जिद्द, मेहनत आणि सरावाच्या जोरावर यशाला गवसणी


तुळजापूर, प्रतिनिधी : शालेय क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये तुळजापूर येथील म. वि. रा. शिंदे हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मयुरेश तानाजी म्हेत्रे याची १७ वर्षांखालील (अंडर-१७) गटात लातूर विभाग स्तरावरून राज्यस्तरीय क्रिकेट निवड चाचणीसाठी निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे तुळजापूरसह मूळ गाव पिंपळा बुद्रुक येथे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, मयुरेशने कोणत्याही क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रशिक्षण न घेता स्वतःच्या कौशल्याच्या, जिद्दीच्या आणि नियमित सरावाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तुळजापूर येथील तालुका क्रीडा संकुल आणि शाळेच्या मैदानावर सराव करत त्याने क्रिकेटमधील आपले कौशल्य विकसित केले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही मोठी गुणवत्ता असल्याचे त्याने दाखवून दिले आहे.
यापूर्वीही मयुरेशची १४ वर्षांखालील (अंडर-१४) गटातून राज्यस्तरीय क्रिकेट निवड चाचणीसाठी निवड झाली होती. आता अंडर-१७ गटातही त्याने आपली चमक दाखवत यशाची पुनरावृत्ती केली आहे. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
मयुरेशच्या या यशामध्ये त्याला मिळालेले शालेय वातावरण आणि मार्गदर्शनही महत्त्वाचे ठरले आहे. शाळेचे मुख्याध्यापक जयप्रकाश पाटील यांनी त्याच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच क्रीडा शिक्षक लालासाहेब आदटराव यांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले.
ग्रामीण भागातून आलेल्या आणि कोणत्याही क्रिकेट अकॅडमीचे औपचारिक प्रशिक्षण न घेतलेल्या मयुरेशने आपल्या मेहनतीच्या बळावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्याच्या पुढील क्रिकेट कारकिर्दीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


AR न्यूज मराठी, रुपेश डोलारे तुळजापूर,