खासगी रुग्णालयांच्या दरपत्रकांची तपासणी करा; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करा! माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते जयकुमार नागनाथ पांढरे यांची मागणी


तुळजापूर | प्रतिनिधी रुपेश डोलारे. 
तुळजापूर शहर व तालुक्यातील खासगी रुग्णालये, क्लिनिक्स आणि नर्सिंग होममध्ये वैद्यकीय सेवा, विविध तपासण्या आणि सुविधांचे दरपत्रक मराठी व इंग्रजी भाषेत ठळकपणे प्रदर्शित केले आहे किंवा नाही, याची तपासणी करण्याची मागणी माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते जयकुमार नागनाथ पांढरे यांनी केली आहे.
यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, धाराशिव तसेच जिल्हा परिषद धाराशिव येथील आरोग्य विभागाकडे आणि ‘आपले सरकार’ पोर्टलवर तक्रार अर्ज सादर करण्यात आला आहे. शासन परिपत्रक दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ मधील निर्देशांनुसार संबंधित वैद्यकीय आस्थापनांची प्रत्यक्ष तपासणी करावी आणि नियमांचे पालन न करणाऱ्यांवर नियमानुसार प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
रुग्णांना उपचारांचा संभाव्य खर्च आधीच समजावा, वैद्यकीय सेवांमध्ये पारदर्शकता राहावी आणि नागरिकांची आर्थिक गैरसोय टाळता यावी, यासाठी आरोग्य विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक असल्याचे पांढरे यांनी म्हटले आहे.
तसेच संबंधित रुग्णालयांची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल आणि करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील सार्वजनिक हितासाठी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
रुग्णांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने तपासणी करून नियमभंग करणाऱ्या वैद्यकीय आस्थापनांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जयकुमार नागनाथ पांढरे यांनी केली आहे.
— जयकुमार नागनाथ पांढरे
माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते, तुळजापूर