धाराशिव बसस्थानकातील पत्रा डब्याला अभय कोणाचे? विभाग नियंत्रक अजय पाटील यांच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह! बसस्थानकाच्या आवारातील मुख्य वाहतूक रस्त्यावर अतिक्रमणाचा आरोप; डीसी अजय पाटील यांच्या भूमिकेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी


धाराशिव (प्रतिनिधी) : धाराशिव येथील नवीन बसस्थानकाच्या आवारात प्लॉट क्रमांक १ जवळील महिला स्वच्छतागृहाच्या पाठीमागे रसवंतीगृहाच्या नावाखाली मुख्य वाहतूक रस्त्यावर उभारण्यात आलेल्या पत्रा डब्याच्या प्रकरणावरून एसटी प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. सार्वजनिक वाहतुकीसाठी असलेल्या जागेवर असा पत्रा डबा उभारण्यास परवानगी कोणी दिली? त्याला अधिकृत मंजुरी आहे का? आणि हा प्रकार संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येऊनही कारवाई का झाली नाही? या प्रश्नांची उत्तरे विभाग नियंत्रक अजय पाटील यांनी द्यावीत, अशी आक्रमक मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेपेक्षा अशा बांधकामांना महत्त्व दिले जात असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर असून वरिष्ठ एसटी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.


एसटी महामंडळाने बसस्थानकाच्या उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला असताना, बसच्या ये-जा आणि वळणासाठी आवश्यक असलेल्या मुख्य वाहतूक क्षेत्रात पत्रा डबा उभारला जाणे हा सार्वजनिक जागेच्या व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न आहे. या डब्यामुळे एसटी बसच्या हालचालींना अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप असून, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. संबंधित जागा कोणत्या आदेशाने देण्यात आली, मंजूर क्षेत्रफळ किती आहे, करार किंवा परवाना अस्तित्वात आहे का आणि प्रत्यक्ष जागेचे मोजमाप काय आहे, याची कागदपत्रांसह चौकशी करण्यात यावी.

 परवानगीशिवाय बांधकाम झाले असल्यास ते तात्काळ हटवून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी.
डीसी अजय पाटील यांच्या भूमिकेची चौकशी करा! या प्रकरणात विभाग नियंत्रक अजय पाटील यांनी कोणती प्रशासकीय कार्यवाही केली, संबंधित जागेची पाहणी झाली का, अतिक्रमणाबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या का आणि कारवाई झाली नसल्यास त्यामागील कारणे काय आहेत, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. कर्तव्यात कसूर, अधिकारांचा गैरवापर किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे पुराव्यांवरून सिद्ध झाल्यास त्यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. एसटी महामंडळाच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत राजाभाऊ राऊत (जिल्हाध्यक्ष, आरपीआय खरात), भालचंद्र कठारे (तालुकाध्यक्ष, आरपीआय), विकास बनसोडे (माजी जिल्हा संघटक, वंचित बहुजन आघाडी), सुनील वाघमारे, उमेश विठ्ठल शिरसाठ यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मुख्य दक्षता अधिकारी आणि विभाग नियंत्रक, धाराशिव यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. पत्रा डबा तात्काळ हटवून जागा वाहतुकीसाठी मोकळी करावी, संबंधित परवानग्या व अभिलेखांची तपासणी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करून लेखी अहवाल द्यावा. प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास लोकशाही व कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
सार्वजनिक वाहतुकीच्या जागेवर मनमानी खपवून घेतली जाणार नाही; प्रशासनाने उत्तर द्यावे आणि कारवाई करून दाखवावी!