नवरात्रोत्सव निर्विघ्न पार पाडणाऱ्या प्रशासनाचा काँग्रेस नगरसेवकांच्या वतीने सन्मान! पोलीस, नगरपालिका आणि एसटी प्रशासनाच्या समन्वयाचे कौतुक; अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन गौरव

 

AR न्यूज मराठी, रुपेश डोलारे तुळजापूर 

तुळजापूर :- तुळजापूर येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेला शारदीय नवरात्र महोत्सव शांततेत आणि कोणत्याही अनुचित प्रकाराविना पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या पोलीस, नगरपालिका आणि एसटी महामंडळ प्रशासनातील अधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील, नगरपालिका मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे आणि एसटी महामंडळाचे आगारप्रमुख महेश रामपुरे यांना पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

काँग्रेस पक्षाचे नगरसेवक तथा नगरपालिकेचे गटनेते अमोल कुतवळ, नगरसेवक रणजीत इंगळे, आनंद जगताप, अक्षय परमेश्वर आणि किरण कदम यांच्या पदाधिकारी व सहकाऱ्यांच्या वतीने हा सन्मान करण्यात आला.

शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात तुळजापुरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. या काळात वाहतूक नियोजन, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच भाविकांना आवश्यक सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणे, अशी विविध आव्हाने प्रशासनासमोर असतात. या सर्व बाबींचे नियोजन करत संबंधित विभागांनी समन्वयाने काम केल्यामुळे उत्सव शांततेत पार पाडण्यास मदत झाली.

भाविकांना सुरक्षित वातावरणात आणि सुरळीतपणे देवीचे दर्शन घेता यावे, यासाठी प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे यावेळी कौतुक करण्यात आले. सार्वजनिक उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांमधील समन्वय आणि जबाबदारीची भूमिका महत्त्वाची असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.