आंबेवाडी, दि. २० ऑक्टोबर २०२६ : मौजे आंबेवाडी, ता. जि. धाराशिव येथील समाज मंदिरात विजयादशमी तथा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला महिला, पुरुष, युवक-युवती तसेच लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवांना अभिवादन केले. बुद्धांच्या शांती, करुणा आणि मानवतेच्या विचारांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचे स्मरण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित नागरिकांनी सामुदायिकरीत्या त्रिशरण व पंचशील ग्रहण केले. या सामूहिक धम्मवंदनेमुळे समाज मंदिर परिसरात बौद्धमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे ऐतिहासिक, सामाजिक व वैचारिक महत्त्व विशद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. हा ऐतिहासिक निर्णय जातिभेद, अस्पृश्यता आणि सामाजिक विषमतेविरुद्धच्या परिवर्तनाच्या लढ्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला. बाबासाहेबांनी मानवाला प्रतिष्ठेने जगण्याचा, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा आणि समतेवर आधारित समाज निर्माण करण्याचा मार्ग दाखवला, असे विचार राजाभाऊ राऊत यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना त्यांनी तथागत गौतम बुद्धांचा शांती, प्रज्ञा, करुणा आणि मैत्रीचा संदेश आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा असल्याचे सांगितले. समाजातील प्रत्येक व्यक्तीने बुद्धांच्या विचारांचे आचरण करावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक मूल्यांचा सन्मान करावा आणि समाजात बंधुभाव व एकोपा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. धम्मचक्र प्रवर्तन दिन हा केवळ उत्सव नसून समता, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारा दिवस असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी गौतम आंबेवाडीकर यांनीही धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या महत्त्वाविषयी आपले विचार मांडले. तथागत गौतम बुद्धांनी दिलेला मानवतावादी विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले सामाजिक परिवर्तनाचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले. महिला, पुरुष आणि लहान मुलांनी एकत्र येऊन धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा आनंद साजरा केला. संपूर्ण कार्यक्रमात उत्साह, सामाजिक एकोपा आणि महामानवांविषयी आदराचे वातावरण पाहायला मिळाले.
या कार्यक्रमाला आरपीआय (खरात) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, गौतम आंबेवाडीकर, संतोष राऊत, दादा राऊत, अविनाश राऊत, हनुमंत कांबळे, नामदेव कांबळे, दामोदर राऊत, राहुल राऊत, मेंसू राऊत, मारुती राऊत, सिनु राऊत, देविदास राऊत, अश्विनी राऊत, कमल राऊत, दिपाली राऊत, लक्ष्मी राऊत, महानंदा राऊत, सुनंदा राऊत, प्रज्ञा राऊत, कोमल राऊत, विमल कांबळे, छाया कांबळे, महानंद कांबळे यांच्यासह आंबेवाडीतील महिला, पुरुष, युवक आणि लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. तथागत बुद्धांचा शांततेचा संदेश आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा विचार घराघरांत पोहोचविण्याच्या निर्धाराने आंबेवाडी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.