दुष्काळ व टंचाई निवारणार्थ धाराशिव जिल्हा परिषदेचे महत्त्वाचे पाऊल! *VB-G RAM-G योजनेतून जलसंधारण व ग्रामीण रोजगारनिर्मितीला गती देण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
AR न्यूज मराठी, रुपेश डोलारे धाराशिव दुष्काळ व टंचाई निवारणार्थ धाराशिव जिल्हा परिषदेचे महत्त्वाचे पाऊल! *VB-G RAM-G योजनेतून जलसंधारण व ग्रामीण रोजगारनिर्मितीला गती देण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
*लोकप्रतिनिधी व प्रशासनाने समन्वयाने काम करण्याचे अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन
*ग्रामीण मजुरांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पात्र कामांचे जास्तीत जास्त मस्टर काढण्याच्या सूचना
‘विकसित भारताची ग्रामक्रांती’ पुस्तकाचे वितरण
जिल्हा परिषद, धाराशिव | दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारण, भूजल पुनर्भरण, चारा व्यवस्थापन, ग्रामीण पायाभूत सुविधांची निर्मिती आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या कामांचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद धाराशिवच्या वतीने विकसित भारत रोजगार व आजीविका हमी ग्रामीण (VB-G RAM-G) योजनेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा मा. सौ. अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यशाळेत दुष्काळ व पाणीटंचाई निवारणासाठी ग्रामस्तरावर करावयाच्या उपाययोजना, ग्रामीण रोजगारनिर्मिती, जलसंधारण आणि विकासकामांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात आला.
*दुष्काळी परिस्थितीत लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एकत्रितपणे काम करण्याचे अध्यक्षा मा. अर्चनाताई पाटील यांचे आव्हान
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना अध्यक्षा अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासन, ग्रामपंचायती, गटविकास अधिकारी आणि ग्रामस्तरीय यंत्रणांनी एकत्रितपणे व समन्वयाने काम करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. अशा आव्हानात्मक परिस्थितीत सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केल्यास दुष्काळ व पाणीटंचाईच्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना करता येतील. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने परस्पर सहकार्याने ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
जलसंधारण, भूजल पुनर्भरण, शेततळी, नाला खोलीकरण, चारा व्यवस्थापन आणि ग्रामीण पायाभूत सुविधांशी संबंधित कामे स्थानिक गरजांनुसार प्राधान्याने हाती घ्यावीत. संबंधित यंत्रणांनी या कामांच्या अंमलबजावणीत आवश्यक ती काळजी घ्यावी आणि कामांचा दर्जा, पारदर्शकता व नियमांचे पालन सुनिश्चित करावे, असेही त्यांनी सांगितले.
*जास्तीत जास्त पात्र कामांचे मस्टर काढा; ग्रामीण रोजगारनिर्मितीला प्राधान्य द्या
ग्रामीण भागातील गरजू मजुरांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण रोजगार सहाय्यकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गरजा आणि उपलब्ध कामांचा आढावा घ्यावा. नियमानुसार पात्र कामे अधिकाधिक प्रमाणात हाती घेऊन आवश्यकतेनुसार मस्टर वेळेत काढण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी दिल्या.
कामांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता राखणे, नियमांचे काटेकोर पालन करणे आणि नागरिकांच्या तक्रारी उद्भवणार नाहीत, अशा पद्धतीने जबाबदारीने कामकाज करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांची माहिती नियमितपणे संकलित करावी. कामांच्या प्रगतीची सद्यस्थिती स्पष्ट होण्यासाठी आवश्यक छायाचित्रे व चित्रफिती उपलब्ध करून द्याव्यात आणि संबंधित गटविकास अधिकाऱ्यांमार्फत पंचायत समिती स्तरावर माहिती व अहवाल वेळेत सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले.
डॅशबोर्डवरील माहिती अद्ययावत ठेवणे, कामांच्या प्रगतीवर नियमित लक्ष देणे आणि अंमलबजावणीतील अडचणी समन्वयाने दूर करणे यालाही त्यांनी महत्त्व दिले . लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामरोजगार सहाय्यक यांनी परस्पर सहकार्याने काम करून दुष्काळ निवारणासह ग्रामीण रोजगारनिर्मितीला गती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
*ग्रामीण रोजगार सहाय्यकांना संगणक संचासह प्रिंटर देण्याचे आश्वासन ; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रोजगार सहाय्यकांचा करणार गौरव ग्रामीण रोजगार सहाय्यकांचे कामकाज अधिक सुलभ, गतिमान आणि पारदर्शक होण्यासाठी त्यांना संगणक संचासह प्रिंटर उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन यावेळी अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्याकडून देण्यात आले. या सुविधांमुळे कामांचे नियोजन, नोंदींचे व्यवस्थापन, आवश्यक कागदपत्रांची छपाई, अहवाल सादर करणे आणि कामांच्या प्रगतीची माहिती अद्ययावत ठेवणे अधिक सुलभ होण्यास मदत होणार असल्याचेमत त्यांनी व्यक्त केले. तसेच ग्रामीण रोजगार सहाय्यकांनी आपल्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून विकासकामांना गती दिल्यास, रोजगारनिर्मितीत उल्लेखनीय योगदान दिल्यास आणि कामकाजात पारदर्शकता व गुणवत्ता राखल्यास त्यांना उत्तेजनार्थ किंवा प्रोत्साहनपर बक्षीस देण्याचा मानसही अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी व्यक्त केला. उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामीण रोजगार सहाय्यकांचा गौरव केल्याने इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि ग्रामस्तरावरील कामकाज अधिक प्रभावी होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
*प्रत्येक गावात किमान एक किलोमीटर नाला खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे आवाहन
कार्यशाळेच्या प्रारंभी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तुकाराम भालके यांनी प्रास्ताविकातून योजनेची उद्दिष्टे आणि जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता आवश्यक असलेल्या कामांची माहिती दिली. प्रत्येक गावामध्ये किमान एक किलोमीटर नाला खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे नियोजन करावे, तसेच सामुदायिक जलसिंचन विहिरींची कामे हाती घ्यावीत, असे त्यांनी सांगितले.
चारा लागवड अनिवार्यपणे करण्यात यावी, यावरही त्यांनी विशेष भर दिला. जलसंधारण, भूजल पुनर्भरण, विहिरींचे पुनर्भरण, शेततळी, जलतारा, चारा व्यवस्थापन तसेच सिंचनाशी संबंधित कामे स्थानिक गरजांनुसार करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून कामांना गती देणे, ग्रामस्तरावरील गरजांनुसार कृती आराखडे तयार करणे आणि कामांचे प्रगती अहवाल विहित वेळेत सादर करणे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. मनरेगा व इतर उपलब्ध योजनांच्या माध्यमातून शेळीपालनासारख्या उपजीविकेच्या साधनांना प्रोत्साहन देऊन ग्रामीण कुटुंबांच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
*जलसंधारणापासून कृषीपूरक उपजीविकेपर्यंत विविध कामांचे मार्गदर्शन
यशदा, पुणे येथील लेखक तथा राज्य प्रशिक्षक श्री. रवींद्र इंगोले यांनी विकसित भारत रोजगार व आजीविका हमी ग्रामीण (VB-G RAM-G) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ग्रामस्तरावर उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती, पाण्याची गरज, स्थानिक रोजगाराच्या संधी आणि ग्रामीण भागातील विकासाच्या आवश्यकता लक्षात घेऊन कामांचे नियोजन करण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
जलसंधारणाच्या कामांमध्ये जलतारा, विहीर व बोअरवेल पुनर्भरण, पाणी साठवणूक टाक्या, शेततळी, मातीचे व दगडी बंधारे, पाझर तलाव, कंटूर बंडिंग, नाला खोलीकरण व रुंदीकरण, सलग समतल चर, सिमेंट बंधारे, गॅबियन बंधारे, तलावांतील गाळ काढणे, भूमिगत बंधारे, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि शोषखड्डे यांसारख्या कामांची उपयुक्तता त्यांनी विशद केली. पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत मुरविणे आणि भूजल पातळीत सुधारणा घडवून आणण्यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार योग्य कामांची निवड करण्यावर त्यांनी भर दिला.
ग्रामीण कुटुंबांच्या उपजीविकेच्या संधी वाढविण्यासाठी चारा लागवड, चारा शेड, फळबाग लागवड, फुलशेती, बोर लागवड, रोपवाटिका, वृक्षलागवड, बांबू लागवड, रेशीम उद्योग, मशरूम उत्पादन, मत्स्यपालन, खेकडा पालन आणि पॉलिहाऊस यांसारख्या कृषीपूरक उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली. वैयक्तिक लाभाच्या कामांमध्ये ठिबक सिंचनासारख्या सुविधांचा विचार करणे, तसेच सामुदायिक भवन, ग्रामीण आरोग्य केंद्र आणि पशुवैद्यकीय दवाखाना यांसारख्या ग्रामीण पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामपंचायतींनी स्थानिक गरजा, उपलब्ध संसाधने आणि रोजगारनिर्मितीची क्षमता लक्षात घेऊन कामांचे प्राधान्यक्रम ठरवावेत. कामांची गुणवत्ता, पारदर्शकता, कालमर्यादा आणि दीर्घकालीन उपयुक्तता यांना महत्त्व देऊन त्यांची अंमलबजावणी करावी, असे मार्गदर्शन श्री. इंगोले यांनी केले.
*‘विकसित भारताची ग्रामक्रांती’ पुस्तकाचे वितरण; व्हीबी-जी रामजी योजनेंतर्गत कामांची माहिती दर्शविणाऱ्या सापशिडीचे अनावरण
कार्यशाळेदरम्यान लेखक तथा राज्य प्रशिक्षक श्री. रवींद्र इंगोले लिखित ‘विकसित भारताची ग्रामक्रांती’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. विकसित भारत रोजगार व आजीविका हमी ग्रामीण (VB-G RAM-G) योजनेच्या अनुषंगाने जलसंधारणाची कामे, उपजीविकेच्या संधी निर्माण करणारे उपक्रम, ग्रामीण पायाभूत सुविधांची उभारणी, दुष्काळ व टंचाई निवारणासाठी आवश्यक उपाययोजना तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण रोजगार हमी योजनेतील सुधारणांवर या पुस्तकातून प्रकाश टाकण्यात आला आहे.
ग्रामस्तरावर कोणती कामे हाती घेता येतील, त्यांचे नियोजन कसे करावे आणि रोजगारनिर्मिती व जलसंधारणाच्या माध्यमातून गावांच्या विकासाला कशी चालना देता येईल, याबाबत मार्गदर्शन करणारे हे पुस्तक उपस्थितांसाठी उपयुक्त ठरणार आहे. यावेळी जिल्ह्यातील ग्रामीण रोजगार सहाय्यकांसह कार्यशाळेस उपस्थित संबंधितांना या पुस्तकाचे वितरण करण्यात आले.
तसेच, VB -RAM-G योजनेंतर्गत विविध कामे करताना घ्यावयाची काळजी, नियमांचे पालन आणि आवश्यक मार्गदर्शक सूचनांची माहिती दर्शविणाऱ्या सापशिडीचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सापशिडीच्या माध्यमातून योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान घ्यावयाची दक्षता, नियम व कार्यपद्धती सहज आणि रंजक पद्धतीने समजून घेण्यास मदत होणार आहे.
*अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून समन्वय व प्रभावी अंमलबजावणीवर भर
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निलेश काळे यांनी दुष्काळ व टंचाई निवारणासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रभावी नियोजन, विभागीय समन्वय आणि विकासकामांच्या अंमलबजावणीतील गती यांचे महत्त्व अधोरेखित केले. उपलब्ध योजनांचा योग्य समन्वय साधून गावांच्या गरजेनुसार कामे हाती घेणे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्तरीय यंत्रणांनी जबाबदारीने व समन्वयाने काम करून जिल्ह्याच्या दुष्काळ व टंचाई निवारणाच्या प्रयत्नांना हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.
*ग्रामीण रोजगार सहाय्यकांनी मानले अध्यक्षा अर्चनाताई पाटील आणि प्रशासनाचे आभार
कार्यशाळेत उपस्थित ग्रामीण रोजगार सहाय्यकांनी आपली मते व अनुभव मांडले. ग्रामस्तरावर काम करताना येणाऱ्या अडचणी, कामांचे नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद प्रशासनाकडून मिळणारे सहकार्य आणि ग्रामीण रोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत घेण्यात येणारी सकारात्मक भूमिका याबद्दल उपस्थित सहाय्यकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी ग्रामीण रोजगार सहाय्यकांना ₹३,००० दिवाळी बोनस देण्यात आल्याबद्दल त्यांनी अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांचे आभार मानले. ग्रामीण रोजगार सहाय्यकांना आवश्यक सुविधा व सहकार्य उपलब्ध झाल्यास ग्रामस्तरावरील कामांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येईल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
*विविध मान्यवरांची उपस्थिती
या जिल्हास्तरीय कार्यशाळेस समाज कल्याण समितीचे सभापती मा. विश्वास हनुमंत कोकणे, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती मा. सिद्धेश्वर बाजीराव कोरे, पंचायत समिती कळंबच्या सभापती मा. राजश्री धनंजय वरपे, पंचायत समिती धाराशिवच्या सभापती मा. गोकर्णा गोपाळ कदम, जिल्हा परिषद सदस्य मा. सीमा भैरवनाथ माडजे, मा. जितेंद्र गुरुनाथ कानडे, मा. प्रदीप सुभाष घोणे, मा. दयानंद प्रभाकर शिंदे, मा. संजय महादेव लोखंडे, मा. निवृत्ती नारायण माळी, मा. प्रदीप तानाजी शिंदे, मा. अनंत नानासाहेब लंगडे, मा. तीर्थराज श्रीकृष्ण घाडगे, मा. सुवर्णा सतीश पाटील, मा. सुमन विठ्ठल सातपुते , मा. सुमन प्रवीण भद्रे , तसेच मा. सविता बिराजदार उपस्थित होते. तसेच सर्व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्ह्यातील ग्रामीण रोजगार सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याशिवाय VB-GRAM-G कक्षांतर्गत गटविकास अधिकारी (नरेगा) श्रीमती स्नेहल कदम, कृषी अधिकारी (नरेगा) श्री. नागेश पाटील, सहाय्यक लेखाधिकारी श्रीमती प्रेमा चेडे, APO श्री. प्रफुल्ल बनसोडे, श्रीमती अश्विनी सौदागर, श्री. जितेंद्र म्हेत्रे , श्रीमती सुनीता चव्हाण, श्रीमती अवंतिका पारडे यांनी सदर कार्यक्रम आणि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
*कार्यशाळेचे सूत्रसंचालन उपशिक्षणाधिकारी (प्रा. ) श्री. दत्तप्रसाद जंगम यांनी केले.
जलसंधारण, दुष्काळ व टंचाई निवारण, ग्रामीण पायाभूत सुविधांची निर्मिती आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी ग्रामस्तरावर नियोजनबद्ध, पारदर्शक व समन्वयपूर्ण प्रयत्न करण्याचा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.