तुळजाभवानी मंदिर संस्थानची बदनामी करणाऱ्या अशोक जगदाळे यांच्यावर कारवाई करा तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष रोचकरी यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

तुळजापूर, दि. १८ : आदरणीय आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यामुळेच राज्य सरकारने तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी १,३२८ कोटी रुपयांचा भरीव निधी जाहीर केलेला आहे. तुळजापूरच्या राजकीय इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळेच विरोधकांना पोटशूळ उठला आहे. वर्षाचे बारा महिने मुंबई-पुण्यात राहून नफेखोरी करणारे निवडणुकीच्या तोंडावर उगवले आहेत. तुळजाभवानी देवीच्या तिर्थक्षेत्राबाबत तालुक्यातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. राज्य सरकार आणि तुळजाभवानी मंदिर संस्थानची राजकीय स्वार्थापोटी बदनामी करणाऱ्या अशोक जगदाळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे करणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी दिली आहे.


तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी सध्या अभूतपूर्व असे काम सुरू आहे. मंदिर समितीच्या स्वनिधीतून ६० कोटी रुपयांच्या कामांना सुरुवात झाली आहे. मंदिराच्या आतील आणि परिसरारातील कामांचा दर्जा, गुणवत्ता आणि ऐतिहासिक-पुरातन महत्व अबाधित राहावे यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या व्यापक दृष्टिकोनातून ही सगळी कामे सध्या पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली हाती घेण्यात आली आहेत. तुळजापूर आणि तुळजाभवानी देवीच्या मंदिरासाठी उभ्या आयुष्यात काहीच रचनात्मक काम ज्यांनी केलेले नाही ते अशोक जगदाळे निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आरोप करीत सुटले आहेत. मुळात यांना तुळजाभवानी मंदिराबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे काय? तुळजाभवानी देवीच्या नावे "मतांचा जोगवा" असा शब्दप्रयोग अशोक जगदाळे यांनी त्यांच्या एका व्हिडीओमध्ये वापरला आहे. आई आंबाबाईचा हा अवमान आहे. त्याचबरोबर अशोक जगदाळे यांनी भाविकांच्या श्रद्धेचाही "जोगवा" हा शब्द वापरून अपमान केला आहे. श्रद्धापूर्वक आई आंबाबाईचा गोंधळ जो भाविक-भुत्या घालतो तोच आईचा जयघोष करीत जोगवा मागत असतो. मात्र जगदाळे यांचे वर्तन राजकीय हेतूने दूषित झाले आहे. तुळजाभवानी देवीच्या भाविकांचा आणि त्यांच्या श्रद्धेचा अपमान करण्यापर्यंत जगदाळे मजल गेली आहे. तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने तुळजापूर मतदारसंघातील भाविक त्यांची लायकी पुन्हा एकदा दाखवून दिल्याखेरीज राहणार नाही. 


राज्य सरकारने छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी १,३२८ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. त्यानंतर स्थानिक तुळजापूरकरांच्या सूचना, अपेक्षा ध्यानात घेऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकास आराखड्याचा सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला. दोन महिन्यांपूर्वीच जिल्हाधिकऱयांनी हा प्रस्ताव पालकमंत्री महोदयांकडे सादर केला आहे. त्यातून साधारणपणे १,५०० ते १,८०० कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. निवडणुकीपुरता गाव आणि तालुक्याचा कळवळा बाळगणाऱ्या अशोक जगदाळे यांना प्रशासकीय कामकाजाच्या प्रक्रियेची माहिती असण्याचा प्रश्नच नाही. बिनबुडाचे आरोप करून तुळजाभवानी मंदिर संस्थानची त्यांनी बदनामी सुरू केली आहे. भाविकांच्या श्रद्धेचाही त्यांनी घोर अपमान केला आहे. त्यासाठी त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हायलाच पाहिजे. जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांची भेट घेऊन आपण जगदाळे यांची तक्रार करणार असल्याचेही रोचकरी यांनी सांगितले आहे. गोंधळ, जोगवा, परडी अशा शब्दांचा वापर स्वतःच्या राजकिय स्वार्थासाठी करीत अत्यंत दूषित आणि खालच्या पातळीचे राजकारण करणाऱ्या अशोक जगदाळे यांनी देविभक्तांची जाहीर माफी मागावी अन्यथा आई तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घेऊन जगदाळे यांच्या दारात त्यांना चांगली अक्कल सुचावी यासाठी तुळजाभवानी देवीला साकडे घालत जागरण गोंधळ घालावा लागेल असा इशाराही रोचकरी यांनी दिला आहे.