न.प. शाळेचा स्तुत्य उपक्रम, हळदी कुंकू कार्यक्रमात वाण म्हणून दिली संविधानाच्या उद्देशिकेची प्रत

संपादक रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव

 तुळजापूर -- वेगवेगळ्या उपक्रमांची खाण असलेल्या शहरातील नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक.3 मध्ये महिला पालकांसाठी आज हळदी- कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिला पालकांना *सौभाग्याचे वाण* म्हणून *भारतीय संविधानाची उद्देशिका व लेखणी* शाळेतर्फे भेट देण्यात आली.


     प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मा. नगरसेविका तथा मा. शिक्षण सभापती मंजुषाताई देशमाने, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा लक्ष्मीताई रणजित भोजने, सौ. उज्ज्वला पंडितराव जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले.


  त्यानंतर शाळेची माजी विद्यार्थिनी, मजूर फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष नारायण (भाऊ) नन्नवरे यांची कन्या डॉ. निविता नारायण नन्नवरे हिचा वैद्यकीय पदवी प्राप्त केल्याबद्दल शाळेतर्फे यथोचित सन्मान करण्यात आला. हळदी कुंकू कार्यक्रमात जवळपास 220 महिला पालकांनी सहभाग घेतला. मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये महिलांचे मोठे योगदान असल्याचे लक्ष्मीताई रणजित भोजने यांनी सांगितले.तर संविधानाच्या उद्देशिकेची प्रत व लेखणी हे नाविन्यपूर्ण वाण लुटल्याबद्दल सौ.उज्ज्वला पंडितराव जगदाळे यांनी शाळेचे कौतुक केले. ऐपत असूनही इंग्रजी माध्यमाच्या शाळेऐवजी न. प.शाळेला प्राधान्य दिल्याचे समाधान यावेळी महिला पालकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.तसे त्यांनी आपल्या मनोगतातूनही सांगितले. 

    याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम मोटे, शिक्षण विभाग प्रमुख अशोक शेंडगे, ज्येष्ठ शिक्षक सतीश यादव, जालिंदर राऊत, शरद कोळगे, दिगंबर थेटे, दत्ता मेढे, अनिल राठोड, अतुल काकडे, रणजित नाईकवाडे, गोविंद प्रताप उपस्थित होते.

     कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ निर्मला कुलकर्णी, वैशाली गोमारे, पुष्पा काळे, कल्पना व्हटकर, मीना वाळा यांनी परिश्रम घेतले.