पंढरपूरकर गल्लीतील नागरिकांचे प्रशासनाकडे लक्ष वेध — अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांचा अभाव

तुळजापूर / प्रतिनिधी


तुळजापूर शहरातील श्री तुळजाभवानी मंदिराच्या शेजारी असलेली पंढरपूरकर गल्ली ही गेल्या अनेक वर्षांपासून भौतिक व मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. या गल्लीत राहत असलेले नागरिक सुशिक्षित असूनही, त्यांच्या परिसरात रस्त्यांची अत्यंत दुरवस्था आहे. बंदनाल्या तुटलेल्या आहेत, तर पावसाळ्यात चिखल व पाण्याच्या तळ्यांमुळे नागरिकांचे हाल होतात.



गल्लीत एखादा पेशंट अचानक आजारी पडल्यास रुग्णवाहिका किंवा रिक्षा आतपर्यंत येऊ शकत नाही, एवढी रस्त्यांची अवस्था बिकट आहे. नागरिकांना अशा परिस्थितीत रुग्णांना हातावर घेऊन बाहेर नेण्याची वेळ येते.


रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, “निवडणुका आल्या की नेते मंडळींनी अनेक आश्वासने दिली जातात. पण निवडणूक झाल्यानंतर मात्र प्रत्यक्षात काहीच काम होत नाही. अनेक वर्षांपासून आम्ही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे मागणी करत आहोत, पण प्रतिसाद मिळालेला नाही,” असे त्यांनी सांगितले.



या माध्यमातून पंढरपूरकर गल्लीतील रहिवाशांनी नगरपरिषद आणि संबंधित लोकप्रतिनिधींकडे मागणी केली आहे की,


गल्लीत तातडीने रस्त्यांचे पक्केकरण करण्यात यावे,

बंद नाल्यांची दुरुस्ती करण्यात यावी,

रुग्णवाहिका, रिक्षा व अन्य अत्यावश्यक वाहनांना ये-जा करण्यासाठी मोकळा रस्ता उपलब्ध करून द्यावा.

नागरिकांच्या या मागणीकडे संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

— पंढरपूरकर गल्लीतील रहिवासी प्रतिनिधी