तुळजापूर गोळीबार प्रकरण– गणेश देवानंद रोचकरी यांच्यासह सहा जणांना जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर


तुळजापूर येथील बहुचर्चित गोळीबार प्रकरणात अटकेत असलेल्या गणेश देवानंद रोचकरी यांच्यासह अन्य सहा आरोपींना जिल्हा सत्र न्यायालय, धाराशिव यांनी दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. बचाव पक्षाचे वकील ॲड एम. बी. माढेकर यांनी मांडलेला प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने हा निर्णय दिला. या प्रकरणात ॲड धर्मराज सरडे व ॲड विशाल बारकुल यांनीही बचाव पक्षाकडून काम पाहिले.
प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानादिवशी तुळजापूर येथील हॉटेल सारंग येथे जुन्या वादातून दोन गटांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यावसान गोळीबारात झाले असून अष्टविनायक जाधव हे गंभीर जखमी झाल्याची फिर्याद तुळजापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ११८(१), ११५(२), १९१(१), १९१(२), १९१(३), १९० तसेच शस्त्र अधिनियम कलम ३, ५, २५, २७ अन्वये गुन्हा (गु.क्र. ६२/२०२६) नोंद करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष देवानंद (भाऊ) साहेबराव रोचकरी यांनी पत्रकार परिषद घेऊन सदर गुन्हा राजकीय द्वेषातून नोंद करण्यात आल्याचा आरोप केला होता.
दरम्यान, गणेश देवानंद रोचकरी, रोहित विक्रम पवार, अक्षय सज्जन गायकवाड, आतिश पोपट भांगे, अजय बंडू क्षिरसागर, मल्हारी कुंदन क्षिरसागर व खंडू विश्वनाथ कांबळे यांनी जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी या अर्जावर सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत सर्व सातही आरोपींना जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले.
या निर्णयामुळे संबंधित आरोपींना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे.