कलाकेंद्र प्रकरणात सर्व आरोपींना दिलासा; जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर. ॲड. विशाल साखरे यांचा युक्तिवाद ठरला निर्णायक; सर्व आरोपींना दिलासा.

 


धाराशिव प्रतिनिधी 

धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 36/2022 अंतर्गत कलाकेंद्रातील एका पीडित महिलेस जबरदस्तीने व्यावसायिक लैंगिक शोषणासाठी प्रवृत्त करणे, तिला डांबून ठेवणे व अत्याचार केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 115(2), 351(3), 64(2)(m), 3(5) सह 34 तसेच अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायदा 1956 च्या कलम 3, 5 व 6 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणात दोन पुरुष व पाच महिलांना आरोपी करण्यात आले होते.

सदर प्रकरणात दोन पुरुष आरोपींनी नियमित जामिनासाठी तसेच तीन महिला आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयात ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांच्या मार्फत दाखल केला होता. दिनांक 17 मार्च 2026 रोजी या प्रकरणाची सुनावणी पार पडली.

सुनावणीदरम्यान ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. फिर्याद उशिरा दाखल करण्यात आली असून, पीडितेने केलेले आरोप तथ्यहीन असल्याचे त्यांनी नमूद केले. संबंधित महिला ही कला केंद्रात कलाकार म्हणून कार्यरत होती व तिने सादरीकरणासाठी करार करून मानधन स्वीकारले होते. तसेच आरोपी हे सर्वजण कला सादरीकरणाद्वारे उपजीविका करीत असून त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप हे खोटे व हेतुपुरस्सर असल्याचा युक्तिवाद त्यांनी न्यायालयासमोर मांडला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. खोमणे यांनी आरोपींचा नियमित तसेच अटकपूर्व जामीन मंजूर केला.

या प्रकरणात ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांना ॲड. मंजुषा विशाल साखरे, ॲड. महेश लोहार, ॲड. शुभम तांबे, ॲड. अमित गोळे, ॲड. संकेत गोरे, ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, ॲड. अर्चना कांबळे, ॲड. ओंकार कोरेगावकर, ॲड. रोहित लोमटे, महेश पवार व पृथ्वीराज खोचरे यांनी सहकार्य केले.