“प्रसंगी विरोधात बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” — पालकमंत्री प्रताप सरनाईक


धाराशिव, दि. ३ मार्च : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर सुरू असलेल्या राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत ठाम इशारा दिला आहे. “सत्ता महत्त्वाची असली तरी पक्षाची एकजूट त्याहून महत्त्वाची आहे. प्रसंगी आम्ही विरोधी बाकांवर बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
नुकत्याच झालेल्या निवडणुका शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकत्रित लढवल्या होत्या. पुढील सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरू असताना काही मंडळींकडून माध्यमांमध्ये दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “शिवसेनेतील एक गट आमच्यासोबत असल्याचा खोटा प्रचार करून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. हा प्रकार सहन केला जाणार नाही,” असे त्यांनी सांगितले.
आमदार तानाजी सावंत यांना वेगळे ठेवून मतभेद असल्याचा आभास निर्माण केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना अखंड व सशक्त आहे. कोणत्याही अफवांना आम्ही बळी पडणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनिता पवार यांच्याशी चर्चा करून पुढील राजकीय रणनीती ठरवली जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच पक्षाच्या अधिकृत भूमिकेशिवाय कोणीही भाष्य करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
“सत्ता हे अंतिम ध्येय असले तरी तत्त्वांशी तडजोड होणार नाही. दबाव, आमिष किंवा अफवांमुळे शिवसेनेची एकजूट ढळणार नाही,” असे ठाम मत व्यक्त करत धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकांनी पक्षनेतृत्वाच्या निर्णयामागे एकदिलाने उभे राहावे व संघटन बळकट करण्यावर भर द्यावा, असे आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.