“महामार्गावर चालत्या वाहनातून चोरी करणारी टोळी २४ तासांत जेरबंद


धाराशिव : महामार्गावरून जाणाऱ्या चालत्या वाहनांमधून माल चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत पर्दाफाश करून तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक धाराशिव शहरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमी मिळाली की, संतोष राजेंद्र शिंदे (रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) याने आपल्या साथीदारांसह इंदापूर ते वाशी मार्गावरून जाणाऱ्या चालत्या पिकअप वाहनातून तेलाचे डबे चोरी केले आहेत. ही माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हालचाल करून आरोपीचा शोध सुरू केला.
दरम्यान, संतोष शिंदे हा येरमाळा येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, पापा शंकर पवार (रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) व आकाश देवीदास शिंदे (रा. पारा) यांच्या साथीने त्यांनी चालत्या पिकअपमध्ये चढून ४ तेलाचे डबे चोरी केले.
पोलिसांनी आरोपींकडून एकूण ८,९६० रुपये किमतीचे ४ तेलाचे डबे तसेच सुमारे ६३,९६० रुपये किमतीची रेडिऑन कंपनीची मोटरसायकल (चेसिस क्रमांक MD625BK627MIA01176) असा मुद्देमाल जप्त केला आहे. तिन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी वाशी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर तसेच चालक पोलीस अमलदार रोहित दंडनाईक यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.